खुनाच्या वाढत्या घटनांनी रत्नागिरी हादरलं, कौटुंबिक कारणेच अधिक

By अरुण आडिवरेकर | Published: March 24, 2023 12:12 PM2023-03-24T12:12:51+5:302023-03-24T12:13:11+5:30

गेल्या वर्षभरात (२०२२) जिल्ह्यात १३ खुनाचे प्रकार घडले आहेत. या वर्षी पहिल्या तीन महिन्यांतच खुनाच्या दाेन घटना

Ratnagiri has been shaken by increasing incidents of murder, more so due to family reasons | खुनाच्या वाढत्या घटनांनी रत्नागिरी हादरलं, कौटुंबिक कारणेच अधिक

खुनाच्या वाढत्या घटनांनी रत्नागिरी हादरलं, कौटुंबिक कारणेच अधिक

googlenewsNext

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : काेतवडे - लावगणवाडी (ता. रत्नागिरी) येथील वृद्धाच्या खुनानंतर पुन्हा एकदा रत्नागिरी हादरली आणि गुन्हेगारीबाबत शांत समजली जाणारी रत्नागिरी आता खरंच शांत राहिली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला. हाणामारी, हल्ला यासारख्या घटना घडतच असतात. मात्र, त्यापुढे टाेकाला जाऊन एखाद्याचा खून करण्याची परिसीमा गाठण्याचे प्रकार रत्नागिरीतही वाढू लागले आहेत, ही चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षभरात (२०२२) जिल्ह्यात १३ खुनाचे प्रकार घडले आहेत. या वर्षी पहिल्या तीन महिन्यांतच खुनाच्या दाेन घटना घडल्या आहेत.

वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी २०२२ मध्ये दापाेलीतील तिहेरी हत्यांकाडाने जिल्हाच हादरला हाेता. निव्वळ दागिन्यांच्या हव्यासापाेटी तीन वृद्धांचा खून करण्यात आला हाेता. जून २०२२ मध्ये सात वर्षांच्या मुलीचा खून करून आत्महत्या केल्याचे भासविण्यात आले हाेते. मात्र, पाेलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आणि चिमुरडीच्या खुनाने सारेच हादरले हाेते. तर सप्टेंबरमध्ये भाईंदर येथील व्यापाऱ्याच्या खुनाने रत्नागिरीकरांना हादरा बसला हाेता. खुनाच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब असून, रत्नागिरी जिल्हा अशांततेच्या दिशेने जात असल्याचे कटू सत्य आहे.


एका वर्षात १२ खून

जानेवारी १, मार्च १, एप्रिल १, मे २, जून १, ऑगस्ट १, सप्टेंबर २, ऑगस्ट २, नाेव्हेंबर १

शिक्षा

आजन्म कारावास (२९ एप्रिल २०१७) : परी प्रशांत करकाळे (२५) हिची हत्या केल्याप्रकरणी सासूला शिक्षा.
जन्मठेप (१६ जून २०१५) : निळीक (ता. खेड) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून. पतीला शिक्षा.
७ वर्षे कारावास : वाडीलिंबू सापुचेतळे (ता. लांजा) येथे दारूच्या नशेत भावाला मारहाण, त्यात त्याचा मृत्यू.
साधा कारावास (२०१८) : उमरे (ता. रत्नागिरी) तरुणाचा मारहाणीत मृत्यू, पाच जणांना शिक्षा.
जन्मठेप (२८ मे २००५) : आवाशी - देऊळवाडी (ता. खेड) येथील तरुणाचा खून, सहा जणांना शिक्षा.

कारणे

साेन्याच्या दागिन्यांसाठी, खंडणीसाठी, लग्न न केल्याने, पत्नीची छेड, पैशांच्या देवघेवीतून, मुलाचे दुसरे लग्न टिकविण्यासाठी, आईला शिवीगाळ, कर्ज फेडण्यासाठी, किरकाेळ वाद, पत्नीशी पटत नसल्याने

काैटुंबिक कारणेच अधिक

राजकीय किंवा गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीतून खून हाेण्याचे प्रकार अन्य जिल्ह्यांमध्ये माेठ्या प्रमाणात घडतात. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या खुनांमध्ये काैटुंबिक कारणेच अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनांनी रत्नागिरी हादरली

  • १३ जानेवारी : वणाैशी खाेतवाडी (ता. दापाेली) येथील तीन वृद्धांचा दागिन्यांसाठी खून करण्यात आला हाेता. या तिहेरी हत्याकांडानंतर एकाला अटक करण्यात आली आहे.
  • ७ मार्च : रानतळे (ता. राजापूर) अश्लिल व्हिडीओसाठी खंडणीसाठी प्राैढाचा खून केला हाेता. एकाला अटक करण्यात आली आहे.
  • २४ एप्रिल : नांदिवडे (ता. रत्नागिरी) येथील जंगलात १९ वर्षीय युवतीचा खून करून मृतदेह टाकण्यात आला हाेता. ही आत्महत्या भासविण्यात आली हाेती. एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
  • ५ मे : पैशांच्या देवाघेवीतून मित्राचा खून करून मृतदेह आंबा घाटात टाकला हाेता. काेल्हापूरच्या दाेघांना अटक.
  • ११ जून : सहकारवाडी (ता. लांजा) मुलाचे दुसरे लग्न टिकण्यासाठी आजीने ७ वर्षांच्या नातीचा खून केला हाेता. सुरुवातीला ही आत्महत्या, असे भासविण्यात आले हाेते. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली.
  • ११ सप्टेंबर : मिऱ्या (ता. रत्नागिरी) घरात गणपती असताना रत्नागिरीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या पतीनेच खून केला. आधी गळा दाबून आणि नंतर जाळून टाकण्यात आले. तिघांना अटक केली आहे.
  • २२ सप्टेंबर : रत्नागिरीतील सुवर्णकाराने भाईंदर येथील व्यापाऱ्याचा खून करून मृतदेह राई - भातगाव येथे टाकला हाेता. या खूनप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
  • ३१ ऑक्टाेबर : क्रांतीनगर - देवरूख (ता. संगमेश्वर) वृद्ध आईचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला हाेता. मुलाला अटक केली आहे.
  • ३१ ऑक्टाेबर : पेठमाप (ता. चिपळूण) येथील महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला हाेता. तरुणाला अटक केली आहे.


गाेळ्या घालून खून

गतवर्षी खुनाच्या १३ घटना घडल्या आहेत. यातील एक घटना केपटाऊन येथे घडली असून, फुरूस (ता. खेड) येथील व्यापाऱ्याचा गाेळ्या घालून खून करण्यात आला हाेता.

अनेक गुन्ह्यांमागे सामाजिक, वैचारिक, मानसिक आणि आर्थिक कारणे असतात. समाजातील विषमता, शिक्षण व्यवस्था, आर्थिक घडी यामुळे गुन्हे घडतात. कुटुंब, शाळा आणि समाज यामध्ये मिळणारी वागणूक याला कारणीभूत ठरते. गुन्हे घडू नयेत, यासाठी पाेलिस सतर्क असतात. एखादा गुन्हा घडलाच तर तसा पुन्हा हाेऊ नये, याकडे लक्ष दिले जाते. - धनंजय कुलकर्णी, पाेलिस अधीक्षक, रत्नागिरी.

Web Title: Ratnagiri has been shaken by increasing incidents of murder, more so due to family reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.