रत्नागिरी : बालगृहातील मुलगा ते वर्कशॉपचा मालक, स्वत:च्या हिंमतीवर उभारले गॅरेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:20 PM2018-07-17T16:20:08+5:302018-07-17T16:27:11+5:30

रिमांड होममधील (आताचे निरीक्षणगृह) मुलाने आपल्या मातेच्या कष्टाचे चीज करीत सुमारे ५० लाखांचे चारचाकी गाड्यांचे गॅरेज स्वत:च्या हिंमतीवर उभारले आहे.

Ratnagiri: He grew up after learning in the remand home, the owner of the garden, the owner of the workshop | रत्नागिरी : बालगृहातील मुलगा ते वर्कशॉपचा मालक, स्वत:च्या हिंमतीवर उभारले गॅरेज

रत्नागिरी : बालगृहातील मुलगा ते वर्कशॉपचा मालक, स्वत:च्या हिंमतीवर उभारले गॅरेज

googlenewsNext
ठळक मुद्देबालगृहातील मुलगा ते वर्कशॉपचा मालक, रिमांड होममध्ये शिकूनच तो मोठा झालाकष्ट आणि प्रामाणिक कामाचा अनोखा प्रेरणादायी प्रवास

शोभना कांबळे

रत्नागिरी : रिमांड होममधील (आताचे निरीक्षणगृह) मुलं म्हटली की, बिघडलेली मुले म्हणून त्यांच्याकडे उपेक्षित नजरेने बघितलं जातंं. पण वडिलांचे छत्र बालपणीच हरवलं. आईने मुलाचे तरी भवितव्य घडू दे म्हणून मनावर दगड ठेऊन धाकट्याला रिमांड होममध्ये दाखल केले. पण आज त्याच मुलाने आपल्या मातेच्या कष्टाचे चीज करीत सुमारे ५० लाखांचे चारचाकी गाड्यांचे गॅरेज स्वत:च्या हिंमतीवर उभारले आहे.

प्रदीप प्रसाद कल्लू या तिशीतील तरूणाने आज तोंडात बोट घालावे, अशी अचाट कामगिरी करून दाखवली आहे. कल्लू कुटुंब कर्नाटकातून सुमारे ४० वर्षांपूर्वी रत्नागिरीत कामधंद्यानिमित्त आले. प्रसाद कल्लू हे ठेकेदार होते. मात्र, मुले लहान असतानाच त्यांचे निधन झाले. साहजिकच घराचा भार आई दुर्गाबाई यांच्या शिरावर आला.

आर्थिक परिस्थिती बिकट झाली. पदरी प्रभाकर आणि प्रदीप ही दोन लहान मुले. त्यांच्या संगोपनासाठी दुर्गाबाई यांनी क्रशरवर काम करण्यास सुरूवात केली. मोठा प्रभाकर याचे कसेबसे पानवल येथील शाळेत दहावीपर्यंत शिक्षण झाले.

प्रदीपचेही याच शाळेत सहावीपर्यंत शिक्षण झाले. रत्नागिरीतील सहृदयी व्यक्तिमत्व असलेले आणि रिमांड होमचे पदाधिकारी दिवंगत डॉ. सुधाकर सावंत यांच्याशी कल्लू कुटुंंबाचा परिचय होता. त्यांनी दुर्गाबाई यांना प्रदीपला रिमांड होम येथे ठेवण्यास सांगितले.

रिमांड होममध्ये आल्यानंतर तो सातवी ते दहावी रत्नागिरीतील देसाई हायस्कूल येथे शिकला. त्याला रत्नागिरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक वर्षाच्या डिझेल मेकॅनिक या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला आणि प्रदीपने त्याचे सार्थक केले.

रत्नागिरीतील एका चांगल्या दुरूस्ती वर्कशॉपमध्ये दोन वर्षे शिकावू म्हणून काम केल्यानंतर तो तिथेच स्थिरावला तो अगदी पुढे १२ वर्षापर्यंत. चार वर्षांपूर्वी त्याने स्वत:चे गॅरेज सुरू केले आणि आपल्याबरोबर अनेक मुलांना काम दिले.

तेथे व्यवसाय भरभराटीला आल्यानंतर जागा अपुरी पडू लागल्याने त्याला स्वत:च्या जागेत मोठे वर्कशॉप असावे, असे वाटू लागले. त्यासाठी त्याने एम. आय. डी. सी.त अगदी मोक्याच्या ठिकाणी जागा मिळवलीही.

याच हक्काच्या जागेत चार महिन्यांपूर्वीच त्याने सुमारे तीस गाड्या राहतील, एवढे मोठे वर्कशॉप उभारले आहे. बँकेनेही आर्थिक सहकार्याचा हात पुढे करीत त्याला ५० लाख रूपयांचे कर्ज देऊ केले. त्याच्या या व्यवसायात कुंदन शिंदे आणि संकेत बंदरकर या मित्रांची भागिदारी आहे.


कामाची संधी दिली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता
गेली दहा वर्षे ज्यांनी मला काम करण्याची संधी दिली, त्या सचिन शिंदे यांच्याबद्दल माझ्या मनात कायम कृतज्ञता राहील. तिथे मी जे-जे शिकलो, त्याचा उपयोग मला आत्तापर्यंतच्या तसेच यापुढच्या प्रवासातही होईल. माझ्या ग्राहकांनी विश्वास दाखविल्यामुळेच मला यश मिळत आहे. त्यावरच माझा अखंड प्रवास सुरू राहणार आहे.
- प्रदीप कल्लू
विद्यार्थ्याचा सार्थ अभिमान


 

डिझेल मेकॅनिक या व्यवसायाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यापासून ते आज यशस्वी उद्योजक बनण्यापर्यंतच्या त्याच्या या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर मी मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. त्याने आत्मसात केलेले कौशल्य व त्याच्यातील आत्मविश्वास पाहून ह्यनोकरापेक्षा मालक बनह्ण यासाठी त्याला सदैव प्रोत्साहन दिले. त्यानुसार माझा हा विद्यार्थी यशस्वी उद्योजक झाल्याचा सार्थ अभिमान आहे.
- संतोष अनंत पिलणकर,
शिल्पनिदेशक, आयटीआय, रत्नागिरी


आयुष्याला कलाटणी

वडार समाजात जन्माला आलेल्या प्रदीप याला रिमांड होममधील शिस्त अवघड वाटत होती. मात्र, शिस्तीबरोबरच तिथे मिळणारे स्वावलंबनाचे धडे यातून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या कालावधीत संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे व्यक्तिमत्व घडत गेले.

स्वतंत्र स्टोअररूम

प्रदीप याने स्वत:च या वर्कशॉपचा आराखडा तयार केला असून, त्यात त्याने विविध गाड्यांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध भागांसाठी स्वतंत्र भाग ठेवला आहे. त्यामुळे दुरूस्तीसाठी येणाऱ्या कुठल्याही गाडीचा स्पेअरपार्ट त्याच्याकडे उपलब्ध असतो.

जिद्दीतून उभारले भव्य दुरूस्ती वर्कशॉप

आपले स्वत:च्या मालकीचे दुरूस्तीचे वर्कशॉप उभारावे या जिद्दीने एकत्र आलेल्या प्रदीप कल्लू, संकेत बंदरकर आणि कुंदन शिंदे यांनी कसेबसे तीस-तीस हजार मिळून ९० हजार रूपये उभे केले. मात्र, ओळखीच्या माणसांनी त्याच्या प्रेमापोटी सुरूवातीलाच त्यांनी लाखो रूपयांचे साहित्य केवळ क्रेडिटवर दिले.

अनेक मुलांच्या हाताला काम

१४ वर्षे दुसऱ्या गॅरेजमध्ये काम केलेल्या प्रदीपने स्वत: गॅरेजमालक झाल्यावर अनेक कुशल - अकुशल मुलांच्या हाताला काम मिळवून दिले आहे. मात्र, त्याचेही काम थांबले नाही तर अधिकच वाढले आहे. त्याच्या कौशल्याविषयी माहिती असलेल्यांना त्यानेच आपली गाडी दुरूस्त करून द्यावी, असे वाटते. त्यामुळे त्याला क्षणभराचीही उसंत नसते.

गुरूंचाही लाडका

देसाई हायस्कूलमध्ये शिकत असताना लाजरा, मितभाषी असलेल्या प्रदीपकडे त्याच्या शिक्षिका अंजली पिलणकर यांचे विशेष लक्ष असायचे. त्यांचे पती संतोष पिलणकर रत्नागिरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निदेशक आहेत. त्यांचे बालगृहात नेहमीच येणे-जाणे असायचे. त्यामुळे दहावी पास झाल्यानंतर त्यांनी सुचविल्याने प्रदीपने डिझेल मेकॅनिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

भाटकरांचे वर्षाचे पालकत्व

बालगृहातील मुलांचे शिक्षण व संगोपन होण्यासाठी पालकत्व योजना राबविली जाते. त्या अंतर्गत प्रदीप बालगृहात असताना रत्नागिरीचे मरिनर कॅ. दिलीप भाटकर यांनी प्रदीप याचे पालकत्व स्वीकारले. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शनही त्याला मिळाले. प्रदीप कामाला लागल्यानंतर त्याने अनेकदा भाटकरसरांच्या गाडीचे काम केल्याचे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद असतो.

Web Title: Ratnagiri: He grew up after learning in the remand home, the owner of the garden, the owner of the workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.