Chiplun Flood: ...अन् खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी आत येऊ लागलं; बघता बघता खेड, चिपळूण पाण्याखाली गेलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 02:13 PM2021-07-22T14:13:26+5:302021-07-22T14:16:07+5:30
Chiplun Flood: रेकोर्ड ब्रेक पाऊस पडला महाबळेश्वरात...त्याचं पाणी आलं जगबुडी नदीत अन् समुद्रालाही भरती. कोकणातील महापुराचं नेमकं कारण...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : डोक्यावर अतिमुसळधार पाऊस आणि त्याचवेळी आलेली भरती यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही आणि रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा दणका बसला. चिपळूण, खेडसह ज्या ज्या भागात खाड्या आहेत, त्या त्या भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला अतिमुसळधार पाऊस पडल्याने खेडच्या जगबुडी नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे.
समुद्र जवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो, हा आजवरचा अनुभव आहे. खाड्या आणि नद्यांमधून पाणी समुद्राला मिळते आणि पुराचे पाणी काही तासातच ओसरते. गुरुवारी मात्र अस्मानी संकटाने कहर केला. रात्री अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. त्यातच पहाटे ३ वाजता भरती सुरु झाली. त्यामुळे खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी पाणी आत येऊ लागले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही आणि बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने दणका दिला.
चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी, खेडमध्ये जगबुडी नदी, रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वरची खाडी, काजळी नदी यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. मात्र भरतीमुळे पावसाचे पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या सर्व ठिकाणी पूर आला.
कोयना धरण भरल्यानंतर तेथील पाण्याचा विसर्ग केल्यास ते पाणी वाशिष्ठी नदीला येऊन मिळते. ज्यावेळी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढतो, त्यावेळी कोयनेच्या पाण्यामुळे पुराचा धोका वाढतो. यंदाही कोयनेतून विसर्ग सुरू असल्यानं वाशिष्ठीला पुराची पातळी ओलांडली आहे.
सातारा जिल्ह्यात विशेषत: महाबळेश्वर परिसरात अतिवृष्टी झाली की तेथील पाणी वाहून येते ते खेडमधील जगबुडी नदीला मिळते. बुधवारी रात्रीपासून महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जगबुडी नदीचे पाणी वाढले आहे. गेल्या काही वर्षात जगबुडी नदीने धोक्याची पातळी अनेकदा ओलांडली आहे. मात्र जुन्या पुलावरून पाणी जाण्याचा प्रकार खूपच कमी वेळा घडला होता. गुरुवारी या जुन्या पुलावरुन पाणी वाहून जात होते. आधीच मुसळधार पाऊस, त्यात भरती आणि त्यात महाबळेश्वरच्या पावसाची भर यामुळे खेड पाण्यात बुडाले आहे.