रत्नागिरी : सेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावर, ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 06:20 PM2018-01-20T18:20:33+5:302018-01-20T18:23:49+5:30
राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.
राजापूर : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.
यापूर्वी महावितरण कंपनीच्या आदेशानुसार तालुक्यातील खासगी जागेत भाड्याने कार्यरत असलेली महावितरणची कार्यालये स्वमालकीच्या जागेत हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी असलेली भाग एक व दोन अशी कार्यालये शहरापासून दोन किमी अंतरावरील दूर अशा महावितरण कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत करण्यात आली होती.
महावितरण विभागाच्या या निर्णयाने राजापूर शहरातील ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू लागला होता. महावितरणशी संबंधीत येत असलेल्या अडीअडचणींबाबत दोन किमी दूर अंतरावर जाताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले होते. ही स्थलांतरीत केलेली कार्यालये मूळ जागेत पुन्हा यावीत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते.
त्यासाठी आमदार राजन साळवी यांच्यासह विधानपरिषद सदस्या अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा करुन ग्राहकांची कशी अडचण येत आहे, ते त्यांच्या लक्षात आणून दिले होते. पण, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.
त्यामुळे संतापलेल्या वीज ग्राहकांनी व सर्व पक्षीयांच्या वतीने दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या कार्यालयावर धडक देण्यात आली होती. तत्पूर्वी आमदार राजन साळवी यांनीदेखील संबंधीत महावितरण कंपनीला चांगलाच दणका दिला होता.
त्यामुळे महावितरण प्रशासन हादरले. नमते घेताना शहरवासीयांची व तालुक्यातील जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला.
त्याला सकारात्मक प्रतिसाद सभापती सुभाष गुरव यांनी देताना पंचायत समितीच्या आवारातील वापरात नसलेल्या गोडाऊनची इमारत तत्काळ देण्याचा निर्णय घेतला व ती स्वच्छ करून जनतेच्या सेवेसाठी विनामोबदला दिली. त्यानंतर महावितरण केंद्राचे ग्राहक तक्रार निवारण केंद्र त्याठिकाणी आणले.