रत्नागिरी : केरळवासियांच्या मदतकार्यात साखरपाच्या जवानाची प्राणांची बाजी, बचावकार्य सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:31 PM2018-08-21T15:31:11+5:302018-08-21T15:35:44+5:30
साखरपा (ता. संगमेश्वर) गावचा सुपुत्र आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा जवान कौस्तुभ फुटाणे आपल्या पथकासोबत केरळ येथे मदत कार्यात गुंतला आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : देवभूमी मानल्या जाणाऱ्या केरळच्या मदतीला महाराष्ट्रही धावला असून साखरपा (ता. संगमेश्वर) गावचा सुपुत्र आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा जवान कौस्तुभ फुटाणे आपल्या पथकासोबत मदत कार्यात गुंतला आहे. पावसामुळे मदत कार्यात अनेक अडथळे येत असल्याने या पथकाचे मदत कार्य सुरूच आहे.
केरळमध्ये राज्याच्या अनेक भागात महापूर आला आहे. केरळमधील या अस्मानी संकटाने सुमारे ३५० बळी घेतले आहेत. पावसाचा जोर कमी न झाल्याने येथील नद्यांना आलेल्या महापुराने या राज्यात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रानेही या राज्याच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.
महाराष्ट्राचे पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे २५ जवानांचे पथक १६ आॅगस्टपासून केरळ राज्यात दाखल झाले आहे. कमांडर राजेश यावले यांच्या नेतृत्त्वाखालील या पथकात साखरपा येथील कौस्तुभ फुटाणे या जवानाचा समावेश आहे.
कौस्तुभ साखरपा येथील ज्येष्ठ छायाचित्रकार रविकांत फुटाणे यांचा सुपुत्र. वैद्यकीय चाचणीत थोड्याच गुणांनी अपयश आलेल्या कौस्तुभची निवड मिलिटरीसाठी झाली नाही. पण, तरीही उमेद न हारता त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. त्यामुळे अखेर त्यांची निवड पुणे तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय राखीव पोलीस दलात (उ. फ. ढ. ऋ.) झाली. त्यानंतर त्यांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. तिथून थेट काश्मीरमध्ये बारामुल्ला सेक्टर येथे पाठविण्यात आले. सात वर्षे त्यांनी या ठिकाणी सेवा केली.
पर्वा न करता मदतकार्य
गेल्या दीड वर्षापासून कौस्तुभ फुटाणे पुणे येथील एनडीआरएफ या दलात कार्यरत आहेत. केरळमध्ये सध्या पावसाने हाहाकार माजविला असल्याने कौस्तुभ फुटाणे यांच्यासह २५ जणांचे पथक केरळमधील अलपुझा जिल्ह्यातील चेंगनूर तालुक्यात जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र मदतकार्यात गुंतले आहे.
पावसाचा जोर
संपूर्ण घरे पाण्यात बुडाली असल्याने घरातील व्यक्तिंना वाचविण्यासाठी या पथकाला खडतर परिश्रम घ्यावे लागत आहेत. त्यातच पावसाचा जोर असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. तरीही अनेक लोकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी सोडण्यात आले आहे, अन्यथा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.
गतवर्षी बिहारला मदत
सध्या थोडासा पाऊस थांबला असल्याने मदतकार्याला वेग आला आहे. येथील परिस्थिती अतिशय बिकट असल्याने अजूनही काही दिवस या पथकाला थांबावे लागणार आहे. गतवर्षी बिहारमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी कौस्तुभ फुटाणे यांचे पथक त्या ठिकाणी कार्यरत होते.
केरळमध्ये दहा - बारा फुटापर्यंत पाणी असल्याने या पाण्यातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढणे व सुरक्षित ठिकाणी नेणे, हे महत्प्रयासाने करावे लागत आहे. पावसाचाही अडथळा आहेच. आज पाऊस थोडा कमी असल्याने काम थोडे सुकर झाले आहे. मात्र, येथील नागरिकांची भाषा बहुतांश मल्याळी असल्याने भाषेचा मोठा अडसर जाणवत आहे. मात्र, हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करत मदतकार्य सुरू आहे. अजून किती दिवस यासाठी लागतील, हे सांगता येत नाही.
-कौस्तुभ फुटाणे,
जवान (एन. डी. आर. एफ.)