रत्नागिरी : महामार्ग होणार चौपदरी; अजून पूल मात्र दुपदरीच, पुलाची कामे मात्र संथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:03 PM2018-05-18T16:03:57+5:302018-05-18T16:03:57+5:30
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. जिल्ह्यात रत्नागिरी वगळता अन्य भागांमध्ये चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. मात्र, महामार्गावरील पुलांच्या बांधकामांना अद्याप वेग आलेला नाही.
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. जिल्ह्यात रत्नागिरी वगळता अन्य भागांमध्ये चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. मात्र, महामार्गावरील पुलांच्या बांधकामांना अद्याप वेग आलेला नाही.
काही पूल अपूर्ण स्थितीत असून, बहुतांश पुलांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे हे पूल दुपदरीच आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
सन २०१३मध्ये मंजूर झालेल्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पासाठी गेल्या वर्षी भूसंपादन करण्यात आले. त्यानंतर चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण ते आरवली व लांजा ते राजापूर या विभागात चौपदरीकरणाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे.
मात्र, आरवली ते वाकेड या मार्गावरील चौपदरीकरण काम सर्वाधिक मागे आहे. चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यात बंद राहणार आहे. त्यानंतर पुन्हा चौपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या चौपदरीकरणाच्या प्रक्रियेतील अनंत अडथळे पार करीत महामार्ग चौपदरीकरणाची गाडी पुढे रेटली जात आहे. राज्यातील अन्य महामार्गांचे चौपदरीकरण झाले असताना मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाकडे दुर्लक्ष झाले होते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाला चालना दिली. त्यामुळेच हा मंजूर प्रकल्प पुढे सरकला.
सुमारे १२ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च या चौपदरीकरणाला येणार आहे. हे चौपदरीकरण २०१८मध्ये पूर्ण होईल, असेही घोषित करण्यात आले होते. त्यासाठी मंत्री गडकरी यांनी वर्षभर जोरदार पाठपुरावाही केला. परंतु हे काम गतीने पुढे सरकले नाही. गेल्या सहा महिन्यांपासून हे चौपदरीकरणातून कॉँक्रीटीकरणाचे हे काम वेगाने सुरू आहे.
कशेडी पायथा (ता. खेड) ते राजापूर तालुक्यातील तळगावपर्यंत या महामार्गाची हद्द असून, हे अंतर २०६.३ किलोमीटर आहे. या महामार्गाची सध्याची रूंदी ३० मीटर्स असून, चौपदरीकरणात ती ६० मीटर्स होणार आहे.
१८९ गावांमधील जागेचे संपादन
रायगड जिल्ह्यातील ४५, रत्नागिरीतील १०४ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० मिळून महामार्ग चौपदरीकरणासाठी या तीनही जिल्ह्यातील १८९ गावांतील वाढीव जमीन घेण्यात आली आहे.
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीखालील केबल्स, रोहित्र, भारत संचार निगमचे खांब, जलवाहिन्यांचे स्थलांतर सध्या केले जात आहे. वनविभागाची चौपदरीकरण जागेत येणारी ३४,०६५ झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.
बावनदी पूल जैसे थे
महामार्गावरील महत्त्वाचा असलेला बावनदी पूल हा ९२ वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात उभारण्यात आला होता. हा पूल आता कमकुवत झाला आहे. महामार्ग चौपदरीकरणात हा पूल नव्याने उभारला जाणार आहे.
मात्र, महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असताना बावनदीच्या पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे २०१९मध्ये चौपदरी महामार्गावरून वाहतूक सुरू झाली तरी महामार्ग चौपदरी व पूल दुपदरी अशी स्थिती होणार काय, असा सवालही केला जात आहे. महामार्गावरील अनेक छोट्या-मोठ्या मोऱ्यांचे कामही अजून झालेले नाही.
१४ महत्वाच्या पुलांचे काम ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पूल हे ब्रिटिशकालीन आहेत. या पुलांची मुदत संपली आहे. चौपदरीकरण प्रकल्पाअंतर्गत महामार्गावरील महत्त्वाच्या १४ पुलांचे कंत्राट एका ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष काम करणाऱ्या उपठेकेदारांना रुपयाही न मिळाल्याने त्यांनी काम बंद केले. परिणामी अर्धवट स्थितीत हे पूल आहेत. जिल्ह्यातील शास्त्रीपूलाचे कामही ठप्प झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी हे काम पुन्हा सुरू झाले आहे.