रत्नागिरी : वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा, पोलिसांची प्रतिमा उंचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 04:07 PM2018-01-08T16:07:11+5:302018-01-08T16:16:38+5:30
वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येते. रत्नागिरी वाहतूक शाखेतील पोलीस सुभाष शिरधनकर यांनीही एका प्रसंगातून असाच प्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.
रत्नागिरी : वाहतूक पोलीस हा कायमच साऱ्यांच्या टिकेचा धनी. त्याने शिस्त दाखवली तरी त्याच्यावर टीका आणि त्याने कोणाला कारवाई न करता कोणाला सोडून दिले तरी त्याने चिरीमिरी घेतल्याची टीका. पण वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येते.
रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलीस सुभाष शिरधनकर यांनीही एका प्रसंगातून असाच प्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.
रत्नागिरीच्या जेलनाका भागात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरूणाचा मोबाईल खाली पडला. काहीतरी रस्त्यावर पडल्याचे वाहतूक शाखेतील पोलीस वाहतूक पोलीस शिरधनकर यांच्या लक्षात आले.
तो मोबाईल असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वाहतूक शाखेचे निरीक्षक अयुब खान यांना हा प्रकार सांगितला. मोबाईलवरील दूरध्वनी क्रमांकांशी संपर्क साधत त्यांनी हा मोबाईल कोणाचा आहे, याची माहिती मिळवली.
रत्नागिरीच्या गवळीवाडा येथे राहणाऱ्या रोहीत कैलास आठवले याचा हा मोबाईल असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. अर्धा ते पाऊण तासात रोहीत आठवले यांना त्यांचा रस्त्यात पडलेला मोबाईल परत मिळाला.
आठवले हे रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारी आहेत. त्यांच्या मोबाईलची किंमत ५२ हजार रूपये इतकी आहे. आठवले यांनी त्यासाठी देऊ केलेले बक्षिसही शिरधनकर यांनी नाकारले. रेझिंग डेनिमित्त पोलीस अनेक उपक्रम करतात. त्याचदिवशी हा अनोखा उपक्रम घडला आणि पोलिसांची मान उंचावली.