रत्नागिरीत मध्यरात्री आगीत घर जळून १३ लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 01:02 PM2021-02-15T13:02:29+5:302021-02-15T13:07:04+5:30
Fire Ratnagiri- रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर खाक झाले. या आगीत तीन कुटुंबांचे सुमारे १३ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर खाक झाले. या आगीत तीन कुटुंबांचे सुमारे १३ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सैतवडे बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली. हे घर सामायिक असून, आगीतील सर्व सामान खाक झाले. मन्सूर हुसेन महंमदअली खलपे यांच्या घरात त्यांची बहीण मैमुना या राहतात. आग लागल्याचे कळताच त्या घरातून बाहेर पडल्याने वाचल्या.
या आगीत त्यांचे ४,५०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अमिना महामूद खलपे या मुंबईला राहत असल्याने त्यांचे घर बंद होते. मात्र, आगीत त्यांचे ४,७०,००० रूपयांचे नुकसान झाले आहे. तर अब्दुल अजीज इसाक खलपे हे रत्नागिरीत राहत असल्याने त्यांचे घरही बंद होते. आगीमुळे त्यांचे ४,५०,००० रुपयांचे नुकसान झाले.
घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जयगड येथील पोर्ट, एनर्जी, चौघुले कंपनी येथील अग्निशमन दल, जयगड खंडाळा पोलीस, सैतवडे सरपंच सागर कदम, गुंबद सरपंच उषा सावंत, मुनाफ वागळे, अजिम चिकटे, साजिद शेकासन, अनिकेत सुर्वे, बानू खलपे, राजेश पालशेतकर, बोरसई ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. रात्री उशिराने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीबाबत जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव यांनी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांना रात्रीच फोनवर माहिती दिली. त्यानंतर रविवार सकाळी आगीचा पंचानामा करण्यात आला.