रत्नागिरी : जलयुक्त शिवारच्या अडचणींकडे दुर्लक्षच; योजनेला निकषांचा बांध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:50 PM2018-03-06T14:50:35+5:302018-03-06T14:50:35+5:30
जलयुक्त शिवार योजनेच्या तिसरा टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी बंधारे बांधकामासाठीचे निकष कोकणासाठी अयोग्य असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील बंधाऱ्यांच्या कामाला ब्रेक मिळाला आहे. त्याबाबत ओरड होऊनही अजून त्याबाबत कोणताही बदल झालेला नाही.
रत्नागिरी : जलयुक्त शिवार योजनेच्या तिसरा टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी बंधारे बांधकामासाठीचे निकष कोकणासाठी अयोग्य असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील बंधाऱ्यांच्या कामाला ब्रेक मिळाला आहे. त्याबाबत ओरड होऊनही अजून त्याबाबत कोणताही बदल झालेला नाही.
जलयुक्त शिवार योजनेतील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असताना तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील ४० गावांची निवड करण्यात आली. जिल्ह्यासाठी १ हजार ६४७ कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी १० कोटी ४६ लाख ४२ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या योजनेंतर्गत विकास माथा ते पायथा या तत्त्वावर गावांची निवड करून वरच्या भागात ७० टक्के क्षेत्र व खालच्या भागात ३० टक्के विकासकामांचे नियोजन करण्यात आले. जलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या एका बंधाऱ्यात एक दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होत असेल तर त्यासाठी ८० हजार रूपये खर्च करण्याचा निकष लावण्यात आला आहे.
साधारणत: सिमेंट नालाबांध बांधण्यासाठी जर १० ते १५ लाख रूपये खर्च करण्यात आले तर त्यामध्ये दहा दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. बंधारे वगळता बंधारे दुरूस्ती, फळबाग लागवड, व शेततळ्यांची कामे मात्र सुरू झाली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २२५ कामे पूर्ण झाली असून, ३० लाख ६४ हजार रूपये खर्च झाला आहे.
कृषी विभागाकडे१ हजार ५०४ कामांचे उद्दिष्ट असून, त्याकरिता ६ कोटी ८१ लाख ७२ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ४२ कामांचे उद्दिष्ट असून, ३ कोटी २६ लाख ५५ हजार रूपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघे एक काम सुपूर्द करण्यात आले असून, त्यासाठी ८ लाख १५ हजारांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडे १०० कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यासाठी १३२ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ४८ लाख ६९ हजार रूपये मंजूर आहेत. लांजा तालुक्याकरिता ७६ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ७२ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राजापूर तालुक्यातील ३७ कामांसाठी १४ लाख ३५ हजारांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, तीनही तालुक्यांतून कोणत्याही कामांना प्रारंभ झालेला नाही. चिपळूण तालुक्याला २८८ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी १ कोटी ६१ लाख १७ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या तालुक्यातून २६ कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी १३ लाख ३५ हजार रूपये खर्च झाले आहेत.
गुहागर तालुक्यामध्ये एकूण ८५ कामे करण्यात येणार असून, त्यासाठी ७० लाख ११ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील ८० कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी १३ लाख ३५ हजार रूपये खर्च झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यासाठी २९२ कामांचे उद्दिष्ट असून, ९७ लाख ८७ हजार रूपयांची निधी मंजूर झाला आहे. अद्याप ३० कामांची पूर्तता झाली असून, त्याकरिता २ लाख ६४ हजार रूपये खर्च झाले आहेत.
दापोली तालुक्याला एकूण १४३ कामांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ४७ लाख २३ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, सध्या अवघे एक काम पूर्ण झाले असून, त्यासाठी २० हजार रूपये खर्च झाले आहेत. खेड तालुक्याकरिता एकूण ३६५ कामांचे उद्दिष्ट असून, १ कोटी ३० लाख ७४ हजारांचा निधी त्यासाठी मंजूर केला आहे.
तालुक्यातून ७८ कामे पूर्ण झाली असून, १० लाख ४० हजार रूपये खर्च झाले आहेत. मंडणगड तालुक्याकरिता ८६ कामांसाठी ३९ लाख १६ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातून २२५ कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी ३० लाख ६४ हजार रूपये खर्च झाले आहेत.
केवळ २२५ कामे पूर्ण
कृषी विभाग वगळता सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यासाठी उद्दिष्ट असलेल्या १६४७ कामांपैकी आतापर्यंत २२५ कामे पूर्ण झाली असून, एक काम सुरू आहे. त्यासाठी ३० लाख ६४ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. ही सर्व कामे कृषी विभागाने केली आहेत.