रत्नागिरी : पालवीमुळे आंबा हंगाम लांबणीवर, जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:40 PM2018-10-17T18:40:08+5:302018-10-17T18:43:23+5:30
गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागत असल्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी : गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागत असल्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यावर्षी ३३७३ सेंटीमीटर इतका पाऊस झाला आहे.पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी राहिले आहे. मात्र सप्टेंबरपासूनच पाऊस गायब असून पावसाळ्यात तीव्र ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. आॅक्टोबरमध्ये अधूनमधून पडलेला पाऊस यामुळे आंबा कलमांना पालवी मोठ्या प्रमाणात आली आहे. हंगामापूर्वी उत्पन्न मिळविण्यासाठी कल्टार सारखी संजीवके वापरली जातात. कल्टार वापरूनसुध्दा झाडांना पालवीच आली आहे.
साधारणत: ज्यावेळी कलमांची जूनी पाने पानगळ होते, त्याचवेळी नवीन पालवी येण्यास प्रारंभ होतो. वास्तविक सप्टेंबर मध्ये पालवी येणे अपेक्षित होते. परंतु आॅक्टोंबरमध्येच पालवीचे प्रमाण वाढले आहे. पालवी आलेल्या कलमांना मोहोर येण्यासाठी पालवी जून होणे गरजेचे आहे. त्यासाठी अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. जर थंडी चांगली असेल तर मात्र मोहोर लवकर येण्याची शक्यता आहे. परंतु आॅक्टोबर निम्मा झाला तरी थंडी गायब आहे. धुके मात्र पडू लागले आहे.
शेतकरी थंडी वाढावी अशी अपेक्षा करीत आहेत. आॅक्टोबरमध्ये जर मोहोर आला तर फळधारणा होवून आंबा मार्चमध्ये बाजारात दाखल होतो. समुद्र किनारपट्टी लगतच्या मोजक्याच झाडांना मोहोर आला आहे. मोहोराचे प्रमाण तर अवघे दोन टक्के आहे. थंडी वाढली तरी पालवी जून होवून मोहोर डिसेंबर उजाडणार आहे.
डिसेंबरमध्ये आलेल्या मोहोराचा आंबा तयार होवून बाजारात येण्यासाठी एप्रिल उजाडणार आहे. एकूणच सध्या तरी पालवी जून होण्यासाठीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. आंबा एकाचवेळी तयार होवून बाजारात आला तर तर घसरण्याची भिती आहे. पालवीमुळे यावर्षीसुध्दा आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. एकूणच जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कमी झालेला पाऊस व अधिकत्तम उष्णता यामुळे झाडांना पालवी येण्याचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होण्यासाठी नैसर्गिकत: अडीच ते तीन महिने लागतात. आॅक्टोबर निम्मा झाला असून सर्वत्र पालवीच पालवी आहे. एकूण ९८ टक्के पालवीचे प्रमाण आहे. दरवर्षी मार्चमध्ये आंबा बाजारात विक्रीस येतो परंतु यावर्षी आंबा बाजारात येण्यास एप्रिल उजाडण्याची शक्यता आहे. दरवर्षी हवामानातील बदलामुळे उत्पादनामध्ये घट होत असून शेतकऱ्यांना त्याची आर्थिक झळ मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत आहे. यावर्षीसुध्दा पिक लांबण्याची शक्यता आहे.
एम.एस.गुरव,
शेतकरी.
शेतकऱ्यांकडून आंब्याला लवकर मोहोर व फळे येण्यासाठी वापरली जाणारी विविध कंपनीची पिक संवर्धन संजिवके वापरण्यात येतात. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ४० हजार लिटर कृषी संजीवकांची विक्री होते. विविध कंपन्याची पिक संवर्धन संजिवके वापरली जातात.
कृषी संजीवकांच्या किमंती भरमसाठ असल्या तरी शेतकरी ती संजीवके वापरतात. यावर्षी संजीवके वापरलेल्या झाडांबरोबर न वापरलेल्या झाडांनासुध्दा मोहोर आला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे संजीवकांसाठी केलेला खर्च शेतकऱ्यांचा वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.