रत्नागिरी : शिक्षक भरती, समायोजनाबाबत येत्या दीड महिन्यात कार्यवाही, विनोद तावडे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 05:35 PM2018-01-11T17:35:43+5:302018-01-11T17:47:28+5:30
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, नवीन भरती, तसेच समायोजनाबाबत येत्या एक ते दीड महिन्यात कार्यवाही करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
रत्नागिरी : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, नवीन भरती, तसेच समायोजनाबाबत येत्या एक ते दीड महिन्यात कार्यवाही करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
एम.डी.नाईक हॉल येथे आयोजित शिक्षणाची वारी कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील शाळांच्या जून्या इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने शाळांचे स्ट्रक्चरर आॅडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने शाळांचे स्ट्रक्चरर आॅडिट करून पुर्नबांधणी, दुरूस्ती याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा असताना स्वयंअर्थसहाय्यित शाळांना प्राधान्य देण्यात येत आहे, या बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा हेतू आहे. कंपनी सेक्शन ८ खाली शाळा काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिवाय अद्यावत शैक्षणिक कॅम्पस तसेच क्रीडा मैदान उपलब्ध व्हावे, हा मानस आहे.
पूर्वीच्या शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंदचा निर्णय घेतला होता. मात्र, आमच्या सरकारने त्याला स्थगिती देऊन १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. २० पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या शाळांची संख्या अधिक होती. त्यापेक्षा १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या कमी आहे.
शिक्षण हक्क कायद्यान्वये एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शाळा व तीन किलोमीटरच्या आत माध्यमिक शाळा असावी. दहा पेक्षा कमी पटसंख्या असणारी शाळा एक किलोमीटरच्या आत असणाऱ्या परंतु जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसहित विलीन करण्यात येणार आहे. ज्यामुळे माध्यमांचाही प्रश्न उद्भवणार नाही. याशिवाय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रमांचा लाभ मिळेल.
रत्नागिरीतील पॉलीटेक्नीकल कॉलेजमध्ये डीग्री कॉलेज सुरू करण्याचा उद्देश होता जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी डिप्लोमा व्होल्डर नाही तर डिग्री संपादित करेल. मात्र, डिप्लोमासाठीच लोकांचा आग्रह अधिक आहे.
जिल्हा क्रीडा संकुलांसाठीचा तीन वर्षाचा निधी सुरक्षित आहे. संकुले उभारल्यानंतर ती चालवावी कोणी ? हा प्रश्न आहे. क्रीडा संकुले अद्यावत करून त्याची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी सुपूर्द केली तरच ती व्यवस्थित सुरू शकतात, असेही सांगितले.