रत्नागिरी : चिपळुणात पाच कात उत्पादकांची तपासणी, १६ टन खैर लाकूडसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 05:04 PM2018-08-17T17:04:58+5:302018-08-17T17:06:57+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडनाका येथे ठाणे वन विभागाच्या भरारी पथकाने खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला. या कारवाईत १६ टन खैर लाकूडसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती ठाणे विभागीय वन अधिकारी संतोष सस्ते यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील पाच कात उत्पादकांच्या व्यवसायाची तपासणी सुरू आहे.
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडनाका येथे ठाणे वन विभागाच्या भरारी पथकाने खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला. या कारवाईत १६ टन खैर लाकूडसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती ठाणे विभागीय वन अधिकारी संतोष सस्ते यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील पाच कात उत्पादकांच्या व्यवसायाची तपासणी सुरू आहे.
या कारवाईत पकडण्यात आलेल्या संशयिताने दिलेल्या माहितीनुसार ठाणे व कोल्हापूर वन विभागाच्या पथकाने चिपळूण तालुक्यातील सावर्डेसह निवळी येथील पाच कात उत्पादकांच्या येथे छापे टाकून खैर लाकूडसाठ्याची तपासणी सुरु केली आहे. यामध्ये सावर्डे येथील सचिन पाकळे यांच्या सचिन कात इंडस्ट्रीजचा समावेश आहे.
वनक्षेत्र अधिकारी विश्वास भंडाळे यांनी पथकासह कोलाडनाका येथे सापळा रचून एका ट्रकची झडती घेतली असता, ट्रकमध्ये खैर लाकडाचा बेकायदासाठा आढळला. या ट्रकमधून शासकीय जंगलातील खैराची वाहतूक होत होती. याप्रकरणी सावर्डे येथील इरफान खलपे याला शासकीय जागेतील खैर लाकडाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
यापूर्वी निवळी (ता. चिपळूण) येथील कात उत्पादकांना शासकीय जागेतील खैराचे लाकूड दिल्याचे खलपे याने वन विभागाला सांगितले. त्यानुसार वन विभागाने खातरजमा करण्यासाठी बुधवारी सावर्डे व निवळी येथे छापे टाकले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता सचिन कात इंडस्ट्रीजचे सचिन पाकळे यांच्यासह अन्य काही व्यावसायिक वन विभागाच्या कार्यालयावर धडकले.
यावेळी त्यांनी कोल्हापूर येथील विभागीय वन अधिकारी प्रकाश बागेवाडी व ठाणे विभागीय वन अधिकारी संतोष सस्ते यांच्याशी कात उत्पादकांवर चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कारवाईबाबत चर्चा केली. पाच विशेष पथकांनी सचिन पाकळे, पराग लोकरे, मनोज डिके, महेंद्र सुर्वे, रमेश रेपाळ यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती सस्ते यांनी दिली.