रत्नागिरी : वैशाख वणव्यामुळे नागरिकांना जगणे असह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 04:28 PM2018-04-20T16:28:07+5:302018-04-20T16:28:07+5:30
वैशाख वणवा सुरु झाल्याने एकूणच वातावरण कमालीचे तापले आहे. वाढत्या उष्म्यामुळे व पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, उष्म्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले आहे.
चिपळूण : वैशाख वणवा सुरु झाल्याने एकूणच वातावरण कमालीचे तापले आहे. वाढत्या उष्म्यामुळे व पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, उष्म्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले आहे.
मार्च महिन्यापासूनच कोकणात ऊन वाढायला लागते. त्याचे चटके असह्य होतात. वैशाख महिना सुरु झाला आणि उन्हाची तीव्रता अधिकच जाणवू लागली. सकाळी सूर्याची किरणे थेट अंगावर घेणे अवघड होऊ लागले. दुपारी तर सगळीकडे रखरखाट असतो. यावेळी रस्त्यावरुन चालणेही अवघड होते.
भाताची मशागत सुरु झाली असून, झाडेही अद्याप उघडी, बोडकी आहेत. त्यामुळे उष्णतेची झळ सहज शरीराला पोहोचते. दुपारच्यावेळी गरम वाफांनी घरात स्वस्त बसणेही अवघड होते. अशावेळी रस्त्यावरुन चालणे हे दिव्यच असते. सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वातावरण कमालीचे तापलेले असते. उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
वाढत्या उष्म्यामुळे गेले तीन ते चार दिवस वातावरणात मोठा बदल झाला आहे. मंगळवारी सायंकाळी चिपळूण तालुक्यात वादळी पाऊस पडल्यामुळे उष्णता अधिकच वाढली आहे.
हा वैशाख वणवा असाच सुरु राहिला आणि तापमान अधिकाधिक वाढत राहिले तर उष्णतेची लाट येऊ शकते. त्याचा परिणाम मानवी आयुष्यावर होऊ शकतो. उष्म्यामुळे शीतपेय, कलिंगड किंवा थंड पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.