रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील तिडेतील कलिंगड शेती संकटात, शेतकरी चांगलेच अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:29 PM2018-04-14T14:29:25+5:302018-04-14T14:29:25+5:30
तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी समाजातील बांधवांकडून केली जाणारी कलिगंडाच्या पिकांची समूहशेती यंदाच्या हंगामात विविध कारणांनी अडचणीत आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिडे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजातील ४२ कुटुंबे भारजा नदीतील पाण्याचा वापर करुन कलिगंडाची शेती करत आहेत.
मंडणगड : तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी समाजातील बांधवांकडून केली जाणारी कलिगंडाच्या पिकांची समूहशेती यंदाच्या हंगामात विविध कारणांनी अडचणीत आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिडे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजातील ४२ कुटुंबे भारजा नदीतील पाण्याचा वापर करुन कलिगंडाची शेती करत आहेत.
कलिगंडाच्या शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध असल्याने या सुविधांचा वापर करुन परजिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर लाभाची शेती मंडणगड तालुक्यात करीत असून, येथील सामान्य शेतकरी केवळ आपल्या भुईभाड्यात समाधानी असतानाच महिलांचा विशेष सहभाग असलेल्या तिडे - आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी आपला पारंपरिक व्यवसाय बंद करुन सर्व अडचणींवर मात करत कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला.
यंदा मात्र या शेतीत अडचणींवर अडचणी येत असल्याने या महिला शेतकरी अडचणीत आल्या आहेत. तांत्रिक कारणांमुळे कलिंगड उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यातच भरीस भर म्हणून कलिंगडाचा हंगाम पंधरा दिवस उशिराने सुरु झाला. हे कमी होते की काय म्हणून मोठ्या प्रमाणावर येथील कलिंगडाची खरेदी करणारे व्यापारी यंदा याठिकाणी खरेदीसाठी आलेच नाहीत व जे आले त्यांनी भाव अगदीच पाडून मागितला.
बाजारात कलिंगडाचा दर वीस रुपये प्रतिकिलो असताना शेतकऱ्यांना जागेवर आठ किंवा नऊ रुपयांचा दर प्रतिकिलो मागे दिला जात आहे. यंदा हा दर शेतकऱ्यांनी तीन ते चार रुपये प्रतिकिलो इतका खाली आणला आहे.
तालुक्यातील तिडे येथील आदिवासी शेतकऱ्यांकडे अजूनही सुमारे दहा टनाच्या आसपास कलिंगडाचा माल शिल्लक आहे. त्यामुळे येथील शेतकरी चांगलेच अडचणीत आले असून, शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी मदतीचे हात पुढे येणे आवश्यक आहे़