रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग खड्ड्यात, बांधकाम खाते अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 02:28 PM2020-10-23T14:28:11+5:302020-10-23T14:42:52+5:30
road, ratnagiri, kolhapur, sefty, highway कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग १६६कडे पाहिले जाते. कोल्हापूरहून कोकणात होणारी बहुतांश वाहतूक रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरून होते. २४ तास सुरू असणारा हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या संपूर्ण महामार्गाची दुरवस्था झाली आहे.
सागर पाटील
टेंभ्ये : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग १६६कडे पाहिले जाते. कोल्हापूरहून कोकणात होणारी बहुतांश वाहतूक रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरून होते. २४ तास सुरू असणारा हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या संपूर्ण महामार्गाची दुरवस्था झाली आहे.
१३१ किलोमीटरच्या प्रवासात प्रवाशांना जवळपास हजार खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. काही खड्डे १५ ते २० सेंटीमीटर खोल गेले आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे जोखमीचे बनले आहे. याचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम अत्यवस्थ रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्ण वाहिकांना बसत आहे.
अशा परिस्थितीतही बांधकाम खाते खड्डे भरण्याची तसदी घेताना दिसत नाही. शासन व प्रशासन यापैकी कोणालाही या महामार्गाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
रत्नागिरी - कोल्हापूर - सोलापूर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १६६ म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गावर काही मूलभूत समस्या जाणवत आहेत. सातत्याने होणारे अपघात लक्षात घेता हा महामार्ग अपघातांचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जात आहे.
या समस्या दूर करण्यासाठी शासन व्यवस्था अथवा बांधकाम खाते यापैकी कोणीही विशेष प्रयत्न करत नसल्याचे या महामार्गावरील स्थानिक लोकांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
यावर्षी कोविड आजाराच्या प्रादुर्भावामुळे जवळपास मार्च महिन्यापासून आजपर्यंत या महामार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक चालू असल्याचे पाहायला मिळत नाही. असे असताना पाली ते मलकापूर या अंतरात अनेक खड्डे पडले आहेत. आंबा ते मलकापूर या दरम्यानही अनेक खड्डे आहेत. खड्डे हे बहुतांश वळणावर पडले असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
वळणावर खड्डे
कोल्हापूर - सांगली व उर्वरित पश्चिम महाराष्ट्रासह बेळगाव येथून रत्नागिरी व विशिष्ट कोकणात होणारी बहुतांश वाहतूक या राष्ट्रीय महामार्गावरून होते. हा महामार्ग चोवीस तास सुरू असतो. या महामार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते.
अपघाताला आमंत्रक
कोकणात व विशेषत: रत्नागिरीमध्ये पर्यटन व देवदर्शनासाठी जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या महामार्गावर सातत्याने गर्दी असते. वाहतूक व अपघाताचे प्रमाण लक्षात घेता महामार्गाचे चौपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.