रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग पाच दिवस राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:21+5:302021-07-29T04:31:21+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या भागात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्गाचे नुकसान ...
रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या भागात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्गाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे साखरपा तसेच घाटातील महामार्गाच्या दुरूस्तीसाठी हा महामार्ग पुढील पाच दिवस बंद राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये आता पाऊस थांबला आहे. चिपळूण, खेडमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला आता वेग आला आहे. गेल्या २४ तासांत एकूण १७५ (सरासरी १९.४४) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पावसाने विश्रांती घेतली असली तरी नुकसान झालेल्या घटनांचे पंचनामे अजूनही सुरूच आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मंडणगडनजिकच्या कुंभार्ली येथील रत्नप्रभा सायकर यांच्या घराचे अंशत: ८ हजार रुपये नुकसान झाले आहे. इस्लामपूर येथील खतिजा महाकुगकर यांच्या घराचे अंशत: ८१ हजार ६०० रुपये नुकसान झाले आहे. कुंभार्ली येथील तुकाराम कलमकर यांच्या घराचे अंशत: ७ हजार ८०० रुपये नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील निवदे येथील पुराच्या पाण्याने पूल वाहून गेला आहे.
जिल्ह्यात तुरळक सर वगळता पावसाने विश्रांती घेतली होती. हवामान खात्याने गुरूवारी जिल्ह्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या भागात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्गाचे नुकसान झाले आहे. तसेच महामार्गाचा काही भाग तीन ठिकाणी तुटला आहे. याठिकाणी महामार्गावरील दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील हा ढिगारा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याठिकाणी खचलेला रस्ता दुरुस्त करण्यासह ढिगारा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे दुरुस्तीचे काम पुढील पाच दिवस सुरु राहणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस महामार्ग बंद राहणार आहे. त्यानंतर या महामार्गाची पुन्हा पाहणी करून सुरुवातीला फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी कळविले आहे.