रत्नागिरी : कमी उंचीच्या खेड - आंबवली पुलामुळे पावसाळ्यात लोकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 04:53 PM2018-07-18T16:53:46+5:302018-07-18T16:56:21+5:30
खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे.
खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे. या नदीवर असलेला कमी उंचीचा जुना पूल पावसाळ्यात कायम पाण्याखाली जाऊन आंबवली परिसरातील ४० गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटत असे.
खेड तालुक्यातील आंबवली परिसरात सुकिवली, कुडोशी, मोहाने, सणघर, चाटव, वडगाव अशी सुमारे ४० गावे आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदी पार करून जावे लागते.
१९५७ साली या नदीवर पुलाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, या पुलाची उंची अतिशय कमी म्हणजे केवळ २.५ मीटर इतकीच असल्याने पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की, कमी उंचीचा हा पूल पाण्याखाली जाऊन आंबवली परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटत असे.
खेडमध्ये शाळा, महाविद्यालयात आलेले विद्यार्थी किंवा दैनंदिंन कामासाठी शहरामध्ये आलेले ग्रामस्थ कधी पुलाच्या अलिकडे, तर कधी पुलाच्या पलिकडे अडकून बसत असत.
पावसाळ्याच्या चार महिन्यांत चोरद नदीला कधी पूर येईल आणि पूल पाण्याखाली जाऊन या गावांचा संपर्क तुटेल याचा नेम नसल्याने पावसाळ्यात या परिसरातील ग्रामस्थ नेहमीच भीतीच्या छायेखाली वावरत असत.
ग्रामस्थांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता चोरद नदीवरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी या परिसरातील लोकांनी लावून धरली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची उंची वाढविण्याबाबतचा प्रस्तावदेखील पाठविण्यात आला होता. मात्र, हा प्रस्तावही शासनाच्या लाल फितीत अडकून पडल्याने पुलाचे काम मार्गी लागत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांची समस्याही निकाली निघत नव्हती. दरवर्षी पुराचा धोका होता. आता हा प्रश्न संपला आहे.
चोरद नदीवर नव्याने पूल बांधावा अशी मागणी अनेक वर्षे करण्यात येत होती. पावसाळ्या या गावांचा संपर्कच तुटत असे. त्यामुळे हा पूल महत्वाचा होता. मात्र, अनेक वर्षे शासन दरबारी धूळ खात पडलेल्या प्रस्तावाला अखेर २०१२मध्ये हिरवा कंदील मिळाला आणि चोरद नदीवरील पुलाची उंची वाढवण्याच्या कामाला चालना मिळाली.
आंबवली परिसरातील अनेक गावांना जोडणारा चोरद नदीवरील पूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाल्याने या मार्गावरील पावसाळ्यात ग्रामस्थांची होणारी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे.