महाशिवरात्रीला रत्नागिरीत नारळाने २० वरून गाठला चाळीशीचा पल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:29 PM2018-02-14T18:29:12+5:302018-02-14T18:33:44+5:30
महाशिवरात्रीला रत्नागिरीतील शिव मंदिरे गजबजली खरी; पण मनोभावे शिवशंकराला नमस्कार करायला जाणाऱ्या भक्तांची मात्र महाशिवरात्र ही मोठी परीक्षाच ठरली. कारण २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाने मंगळवारी चाळीशी गाठली होती.
विहार तेंडुलकर
रत्नागिरी : महाशिवरात्रीला रत्नागिरीतील शिव मंदिरे गजबजली खरी; पण मनोभावे शिवशंकराला नमस्कार करायला जाणाऱ्या भक्तांची मात्र महाशिवरात्र ही मोठी परीक्षाच ठरली. कारण २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाने मंगळवारी चाळीशी गाठली होती.
महाशिवरात्रीनिमित्त रत्नागिरी शहरात शिव मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. प्रसिध्द काशिविश्वेश्वर मंदिरातही भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. दुपारीही विश्वेश्वर मंदिरापासून सुमारे दीड किलोमीटर लांबीची रांग लागली होती.
दरम्यान, भक्तांची वाढती संख्या पाहून नारळ विक्रेत्यांनी उखळ पांढरे करून घेतले. एरव्ही बाजारात २० रुपयांना मिळणारा नारळ मंदिराबाहेर चक्क ४० रुपयांना विकण्यात येत होता.
मंदिरात जाताना भक्तगण घरातून सामान आणणे पसंत करत नाहीत, तर ते मंदिराबाहेरच्या स्टॉलवरूनच विकत घेतात. त्याचा फायदा आज या व्यावसायिकांनी उचलल्याचे दिसून आले. ४० रुपयांना मिळणारा नारळ पाहून सामान्य भक्तानी हात आखडता घेत बेलपत्रच शिवपिंडीवर वाहणे पसंत केले.
अनेक रोगांन नारळ ग्रस्त
रत्नागिरी जिल्हा हा पूर्वी आंबा, काजूसह अन्य पिकांबरोबर नारळ उत्पादनातही अग्रेसर होता. मात्र गेल्या काही वर्षात नारळाचे उत्पादन झपाट्याने घटले असून त्यामुळे अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात नारळ मागवला जातो. पूर्वी रत्नागिरीत पिकणारा नारळ हा आकाराने मोठा होता. आता विविध रोगांमुळे नारळाच्या आकारातही झपाट्याने घट झाली आहे.
नारळाचे उत्पादन घटले
रत्नागिरी जिल्ह्यात नारळाचे उत्पादन झपाट्याने घटत असून नारळ विकास केंद्राच्या (कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड) रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजार २५० हेक्टर क्षेत्र नारळ पिकाखाली आहे. सिंधुदूर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा छोटा असूनही त्याठिकाणी १७ हजार ५५५ हेक्टर क्षेत्र नारळ पिकाखाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांशी नारळाची झाडे ही दाटीवाटीने लावण्यात आल्याने नारळाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.
व्यापाऱ्यांकडूनही पिळवणूक
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या उत्पादीत होणारा नारळ हा सण समारंभ यासाठीच विकला जातो. मात्र काही प्रमाणात नारळाची बाजारात व्यापाऱ्यांमार्फत विक्री केली जाते, तोही अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. रत्नागिरीच्या बाजारपेठेत व्यापारी जो नारळ १६ ते २० रुपयांनी विकला जातो, तो शेतकऱ्यांकडून केवळ ८ रुपयांनी विकत घेतला जातो. यावरूनच व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक लक्षात येते.