रत्नागिरी : प्रत्येक तालुक्यात आंबा महोत्सव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळानेही घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 03:59 PM2018-01-08T15:59:16+5:302018-01-08T16:03:35+5:30
रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रत्येक तालुक्यात महामार्गालगत आंबा विक्रीसाठी शेड उभारून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळानेदेखील त्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रत्येक तालुक्यात महामार्गालगत आंबा विक्रीसाठी शेड उभारून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळानेदेखील त्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आंब्याची विक्री शेतकऱ्याला स्वत:च करता येणार आहे. यापुढे उत्पादक ते ग्राहक अशी संकल्पना राबविण्याचा बाजार समितीचा संकल्प आहे.
रत्नागिरी हापूसला ग्राहकांकडून चांगली मागणी होत असतानाच त्याच दरम्यान कर्नाटकचा हापूस आंबा बाजारात येतो. व्यापारीवर्ग मात्र ग्राहकांची दिशाभूल करून रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करतो.
कमी किंमतीत कर्नाटक हापूस खरेदी करून तो चढ्या दराने रत्नागिरी हापूस म्हणून विक्री केला जातो. यामध्ये व्यापाऱ्यांचा फायदा होतो व गरीब शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होते. हे टाळण्यासाठी बाजार समितीने तालुकापातळीवर आंबा महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी, सचिव किरण महाजन, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, सहाय्यक उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी हे जिल्हाभर दौरा करून शेतकऱ्यांना याबाबत माहिती देत आहेत.
बाजार समितीच्या आवारात आंबा लिलाव शेड बांधण्यात आली असून, यावर्षी आंबा पिकाच्या हंगामात परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे माल विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांकडील आंब्याच्या थेट खरेदीसाठी मुंबई, पुणे येथील व्यापाऱ्यांना रत्नागिरीत बोलावण्यात येणार असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला स्वत: दर ठरवून विक्री करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
काजू पीक तारण
शेतकऱ्यांना काजू बीसाठी ७५ टक्के किंवा ८० रूपये किलोप्रमाणे ६ टक्के व्याजाने पीक तारण कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज शेतकऱ्यांनी १८० दिवसात फेडावयाचे आहे.
विविध कार्यकारी सोसायटी किंवा बाजार समितीने नियोजन केलेल्या गोडावूनमध्ये काजू पीक तारण म्हणून ठेवायचे आहे. चांगला दर काजूला मिळाल्यावर त्याची विक्री करू न हे कर्ज फेडता येणार आहे.