रत्नागिरी : मराठा समिती तिसरी आघाडी स्थापणार, दिवाळीदिवशी नवीन पक्षाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 05:07 PM2018-09-20T17:07:34+5:302018-09-20T17:09:19+5:30
मराठा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आश्वासने देऊन झुलवत ठेवले. समाजाचं अस्तित्व उभे करण्यासाठी तसेच मराठ्यांना भविष्यात नेतृत्व मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्य समाजांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
रत्नागिरी : मराठा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आश्वासने देऊन झुलवत ठेवले. समाजाचं अस्तित्व उभे करण्यासाठी तसेच मराठ्यांना भविष्यात नेतृत्व मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्य समाजांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
दिवाळी पाडव्यादिवशी नवीन पक्षाचे नाव श्री रायरेश्वर मंदिरात झेंडा लावून घोषित करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष राज्य समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
शासनाने फसवणूक केल्यामुळेच ठोक आंदोलन सुरू झाले. ३६ मराठ्यांनी आत्महत्या केली. विविध पक्षांनी मराठा समाजाची चेष्टा केली आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी आता मतदार बँक तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत सरकारने समाजाला गृहीत धरून प्रश्न सोडविलेले नाहीत. समाजाचा विकास करण्यासाठी, प्रश्न सोडविण्यासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी विचार विनियम सुरू असतानाच सोशल मीडियावरून तसेच विविध सर्वेक्षणताून स्वतंत्र पक्षाची मागणी पुढे आली.
कोल्हापूर, कणवकलीतही यासाठी चांगला प्रतिसाद लाभला. नवीन पक्षाच्या स्थापनेसाठी अकरा कोअर कमिटी व पाच हजार मराठा बांधव रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेणार असून, पाडव्याला पक्षाचे नाव घोषित करण्यात येणार आहे. याबाबत दि. २८ रोजी ठाणे, २९ रोजी कल्याण, दि. ३० रोजी मुंबईत मेळावा आयोजित केला आहे.
मराठा बांधव समाजासाठी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेता समाजासाठी प्रामाणिक राहणार आहे. मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजातील नाराज मंडळी भेट घेत असून, वेळ पडल्यास त्यांनाही सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. एकदाच परंतु जातीसाठी मतदान करा, असे आवाहन पाटील यांनी केले.
फायदा मिळाला नाही
जोपर्यंत कोर्टातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसी धर्तीवर शिक्षणात ५० टक्के सवलत, अण्णासाहेब साठे आर्थिक विकास महामंडळातर्फे बिनव्याजी दहा लाख रूपये कर्ज, वसतिगृह अशा सात सवलतींचे अध्यादेश काढल्याचे घोषित केले. परंतु त्याचा फायदा झालेला नाही, असे पाटील म्हणाले.