रत्नागिरी : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले मनसेने टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:39 PM2018-10-26T13:39:10+5:302018-10-26T13:40:28+5:30
कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी रात्री ९.३० वाजता विंचूदंशाचा रुग्ण आणला असता, त्याठिकाणी डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीही उपस्थित नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी चक्क या आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकत निषेध नोंदवला.
आरवली : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी रात्री ९.३० वाजता विंचूदंशाचा रुग्ण आणला असता, त्याठिकाणी डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीही उपस्थित नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी चक्क या आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकत निषेध नोंदवला. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर वैद्यकिय अधिकारी कदम यांनी विनंती केल्यानंतर अखेर रात्री उशीरा टाळे खोलण्यात आले.
बुधवारी रात्री तुरळ चोबारवाडी येथील विंचूदंशाचा रुग्ण कृ ष्णा पाचकले यांना येथे आणले असता केंद्राच्या दरवाजाला कडी आढळून आली. ग्रामस्थांनी ही बाब मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या कानावर घातली. चव्हाण यांनी प्रत्यक्ष पहाणी केली असता तेथे डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीच नसल्याचे दिसले. त्यानंतर चव्हाण यांनी संबंधित रुग्णाला खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी हलविले आणि तासभर वाट पाहिली. मात्र कोणीही दिसून न आल्याने अखेर त्यांंनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला.
याचवेळी ह्युमिनीटी युनाटेड फेडरेशनचे कोकण विभागाचे अध्यक्ष सचिन शिंदे, रुपेश सावंत, सतिश राणे हे पदाधिकारी या भागात आपल्या खासगी कामासाठी आले असता त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची माहिती घेऊन ही बाब तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांच्या कानी घालण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी रायभोळे यांना भ्रमणध्वनीवर याबाबतची माहिती देण्यात आली.
रुग्णकल्याण समिती अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांना घटनेची खबर मिळताच त्यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. घटनेची खबर मिळताच परिसरातील ३० ते ४० ग्रामस्थ याठिकाणी जमा झाले होते.संबंधित वैद्यकिय अधिकारी यांचे निवासस्थानाची पहाणी केली असता निवासस्थानाच्या बाहेरील मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. यावेळी याठिकाणी पांढऱ्या रंगाच्या दोन पिशव्यांमध्ये २५ ते ३० दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या.
या सर्व घटनांची पंचयादी सर्व उपस्थितांच्या समक्ष आणि कर्मचाऱ्यांच्या सहीने घालण्यात आली. त्याचवेळी ड्युटीवर असणाºया वैद्यकिय अधिकारी कदम येथे हमर झाल्या मात्र कोणतीही चर्चा न करता निघून गेल्या.
तासाभराने कदम यांनी जितेंद्र चव्हाण यांना टाळे काढण्याची विनंती केली. त्यानंतर रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर रात्री उशीरा चव्हाण यांनी टाळे काढण्याचा निर्णय घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांनी यावर समक्ष भेट देऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण टाळे काढण्याचा निर्णय घेत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केंद्रावर लाखो रुपये खर्च होऊनही शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जावे लागत असल्याने मृतांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत आहे. आरोग्य केंद्र परिसरात वाढलेले गवताचे जंगल मात्र तसेच असल्याने या परिसरात फिरणे धोकादायक बनले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या दोन डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे पूर्वी एकच डॉक्टर असताना रुग्णाच्या होणाऱ्या तक्रारी आता कमी होणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता या तक्रारी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहेत. याबाबत तक्रार केली असता आपली नियुक्ती रद्द करुन घेण्याच्या धमक्या देत असल्याने ग्रामस्थ तक्रार करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे.