रत्नागिरी : शेतीला आधुनिकतेची जोड, जोडीला विविध भाज्यांच्या लागवडीतून उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:52 PM2018-08-25T12:52:10+5:302018-08-25T12:57:26+5:30

पावसावर अवलंबून केली जाणारी पारंपरिक शेती आता कमी झाली आहे. कोकणातील शेतकरी आधुनिक तंत्राचा वापर करून भातशेतीबरोबरच इतरही शेती करून उत्पन्नात वाढ करू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पावसाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता इतर पर्यायांचा अवलंब करून शेतीकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत.

Ratnagiri: A modern combination of agriculture, coupled with the cultivation of various vegetables | रत्नागिरी : शेतीला आधुनिकतेची जोड, जोडीला विविध भाज्यांच्या लागवडीतून उत्पन्न

रत्नागिरी : शेतीला आधुनिकतेची जोड, जोडीला विविध भाज्यांच्या लागवडीतून उत्पन्न

googlenewsNext
ठळक मुद्देएक एकर क्षेत्रावर गादी वाफे पद्धतीने भातशेती, विविध भाज्यांच्या लागवडीचा यशस्वी प्रयोगगुंठ्याच्या क्षेत्रावर काळीमिरीची लागवड; कलिंगड लागवडीचा प्रयोगही यशस्वी

शोभना कांबळे

रत्नागिरी : पावसावर अवलंबून केली जाणारी पारंपरिक शेती आता कमी झाली आहे. कोकणातील शेतकरी आधुनिक तंत्राचा वापर करून भातशेतीबरोबरच इतरही शेती करून उत्पन्नात वाढ करू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पावसाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता इतर पर्यायांचा अवलंब करून शेतीकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी येथील संजय जानू बंडबे यांनीही पारंपरिक शेतीची कास धरतानाच आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरूवात केली आहे. सुमारे एक एकरवर ते भातशेतीचे उत्पन्न घेत आहेत. मात्र, त्यापैकी दहा गुंठे क्षेत्रावर ते आधुनिक गादी वाफे पद्धतीने शेती करू लागले आहेत.

सत्कोंडीसारख्या ग्रामीण भागात राहून ते आता नव्या पद्धतीकडे वळले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही बरेचसे शेतकरी केवळ पारंपरिक पद्धतीने असलेल्या शेतीवर अवलंबून राहतात. ही शेती पावसावर अवलंबून असल्याने पाऊस चांगला झाला तरंच तो शेतीला पोषक ठरतो. त्यामुळे हल्ली अनेक शेतकरी शेतीपासून दूर जाऊ लागले आहेत. मात्र, काही शेतकरी शेतीत नवीन प्रयोग करून अधिक उत्पन्न घेवू लागले आहेत.

सत्कोंडी येथील संजय बंडबे यांची एक एकरवर भातशेती आहे. ही भातशेती करतानाच त्यांनी याच क्षेत्रावर विविध भाज्यांची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. या एकरमधील दहा गुंठ्यावर त्यांनी गादीवाफे पद्धतीने भातशेती करण्यास गेल्या वर्षापासून सुरूवात केली. त्यासाठी घेतलेल्या परिश्रमातून त्यांनी गतवर्षी १६ मण पीक घेतले. यावर्षी आत्मविश्वास अधिक वाढल्याने त्या अनुभवातून यावर्षी अधिक पीक घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

पावसाळी शेतीनंतरही केवळ त्यावरच अवलंबून न राहता, गेल्या काही वर्षांपासून बंडबे यांनी याच क्षेत्रावर विविध भाज्यांची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. या क्षेत्रात ते पालाभाजी, वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, सिमला मिरची या भाज्यांची लागवड दरवर्षी करतात.

या भाज्यांना सत्कोंडी तसेच इतर भागात चांगली बाजारपेठ मिळत आहे. बंडबे यांचा सेंद्रीय खताकडे ओढा असल्याने त्यांच्याकडील उत्कृष्ट चवीच्या व दर्जेदार असलेल्या विविध भाज्यांना या भागात चांगली मागणी आहे. या भाज्यांना दरही चांगला मिळत आहे.

सत्कोंडीतील इतरही शेतकरी आता एकत्र आले आहेत. त्यामुळे अशा एकत्र आलेल्या या अकरा शेतकऱ्यांनी आपल्या भाज्यांचे मार्केटिंगही एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. सत्कोंडीत तशी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने या शेतकऱ्यांच्या भाज्यांनाही चांगली बाजारपेठ मिळत आहे. येथील शेतकऱ्यांची एकी वाखाणण्याजोगी आहे.

बंडबे यांनी एका गुंठ्यामध्ये गेल्या वर्षापासून उपयोगी असलेल्या काळीमिरीचे उत्पन्न घेण्यास सुरूवात केली आहे. यावर्षीही त्यांनी सुमारे १५० काळेमिरीची रोपे लावली आहेत. काळीमिरी ही वेलवर्गातील असल्याने एखाद्या मोठ्या झाडाच्या आधाराने तिची रोपे लावली जातात. मात्र, ही झाडे मुळातच मोठी असल्याने त्यावर चढलेल्या वेलावरील मिरी काढणे अडचणीचे होते, हे लक्षात घेऊन संजय बंडबे यांनी झुडूपवर्गीय प्रकाराने काळीमिरी लागवड केली आहे.

या लागवडीसाठी त्यांनी शेड तयार केली आहे. त्यामुळे ही रोपे पाच फुटांपर्यंत वाढल्यानंतर त्यांची छाटणी केली जाते. काळीमिरीच्या एका रोपापासून त्यांना सुमारे २०० ग्रॅम उत्पन्न मिळते. हे पीकही ते वर्षातून दोनदा घेत आहेत.

विविध लागवडींचा प्रयोग

संजय बंडबे आपल्या एक एकरावरील पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता, विविध लागवडींचा प्रयोग करीत आहेत. भातशेती झाल्यानंतर ते या जागेत विविध भाज्यांची लागवड करून त्यापासून उत्पादन घेत आहेत. त्यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. याआधीही त्यांनी या जागेत कलिंगडाची लागवड यशस्वी करून दाखविली आहे.

अकरा शेतकरी एकत्र आले

सत्कोंडीतील संजय बंडबे भाज्यांची लागवड करताना त्यासाठी कुठल्याही कृत्रिम खताचा वापर न करता, शेणखत, गांडूळखत यांचा वापर करतात. सेंद्रीय खतांच्या भाज्यांना या भागात अधिक पसंती असल्याने या भाज्यांना मागणी वाढू लागली आहे. बंडबे यांच्यासह अकरा शेतकरी एकत्र आले असल्याने या परिसरातील मागणीनुसार भाज्यांचा पुरवठा करणे शक्य होत आहे.


पारंपरिक शेतीतून आता म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे आता नव्या पद्धतीने गादी वाफ्याद्वारे दहा गुंठे क्षेत्रावर भातशेतीचे उत्पन्न घेण्यास सुरूवात केली आहे. या पद्धतीने आता उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी चांगले पीक मिळाले असल्याने यावर्षीही अधिक पीक घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- संजय बंडबे, शेतकरी

Web Title: Ratnagiri: A modern combination of agriculture, coupled with the cultivation of various vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.