रत्नागिरी : आंबाघाटात मोऱ्यांचे काम संथ, वीस दिवसांपासून एकेरी वाहतूक, वळण वाहतुकीस धोक्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 04:00 PM2018-04-20T16:00:17+5:302018-04-20T16:00:17+5:30
आंबा घाटातील गायमुख व कळकदरा फाटानजीक महामार्गावरील मोरीचे बांधकाम संथगतीने चालल्याने घाटातील रात्रीची वाहतूक धोकादायक बनली आहे.
साखरपा / आंबा : आंबा घाटातील गायमुख व कळकदरा फाटानजीक महामार्गावरील मोरीचे बांधकाम संथगतीने चालल्याने घाटातील रात्रीची वाहतूक धोकादायक बनली आहे.
घाटात सकाळच्या सत्रात धुके असते. त्यातच संरक्षक कठडे तुटले आहेत. शिवाय बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या वीस दिवसांपासून एकेरी वाहतूक चालू आहे. गायमुख येथे मारूती व गणेशाचे मंदिर आहे.
येथे घाटातील एकमेव पाणवठा असल्याने वाहनधारक व पर्यटक विसावतात. याच वळणावर दख्खन, साखरपा येथील व्यावसायिक विविध पदार्थांची विक्री करत असतात. याच एस आकाराच्या वळणावर चालू असलेल्या मोरीच्या बांधकामामुळे रस्ता अडचणीचा ठरला आहे.
पाईप, मशिनरी, त्यात पर्यटकांची वाहने त्यामुळे गायमुख वळण वाहतुकीस धोक्याचे बनले आहे. ठेकेदाराने या मोऱ्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून परिसरातील कोसळलेले संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी पर्यटकांतून करण्यात येत आहे.
कठड्यांची दुरूस्ती केव्हा?
घाटातील दरीकडील निकामी व कोसळलेल्या संरक्षक कठड्यांची पुनर्बांधणी करावी, म्हणून गेल्या दोन वर्षांपासून वाहनधारकांतून ओरड होत आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी कठडे बांधकाम व भिंतीच्या बांधकामाला निधी मंजूर झाल्याचे समजते. पण, प्रत्यक्षात कठडे बांधण्यास प्रारंभ झाला नाही. दरीलगत कठड्याऐवजी मातीने भरलेली बॅरेल उभी करून ठेवली आहेत, तर काही ठिकाणी दगड उभे केले आहेत.