स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी नगरपरिषद संपूर्ण भारतात २३वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:30 PM2019-03-07T13:30:36+5:302019-03-07T13:35:51+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये रत्नागिरी नगरपरिषदेने देशात २३वा, तर पश्चिम भारतात २०वा क्रमांक पटकावला आहे. कोकणात प्रथम क्रमांक पटकावून नगरपरिषदेने दिल्ली दरबारी आपला झेंडा फडकावला असून, दिल्ली येथील कार्यक्रमात मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा सन्मान करण्यात आला.
रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये रत्नागिरी नगरपरिषदेने देशात २३वा, तर पश्चिम भारतात २०वा क्रमांक पटकावला आहे. कोकणात प्रथम क्रमांक पटकावून नगरपरिषदेने दिल्ली दरबारी आपला झेंडा फडकावला असून, दिल्ली येथील कार्यक्रमात मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा सन्मान करण्यात आला.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत देशभरातील ४ हजार २३७ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले. या सर्वेक्षणाचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झाला.
या निकालात देशात रत्नागिरी नगरपरिषदेने देशात २३वा क्रमांक प्राप्त केला. पश्चिम भारतात २०वा आणि कोकणात पहिला क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी नगरपरिषदेने ४०वा क्रमांक पटकावला होता.
महाराष्ट्रातील सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी नगरपरिषदेचा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा व राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हैसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमाला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, आरोग्य विभागाच्या श्रेया शिर्वटकर, संदेश कांबळे उपस्थित होते.