रत्नागिरी नगरपरिषदेचे दीडशे कोटींचे अंदाजपत्रक मंजूर, अनेक विकासकामांसाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 05:44 PM2018-02-24T17:44:59+5:302018-02-24T17:44:59+5:30
रत्नागिरी नगर परिषदेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या शिलकी अंदाजपत्रकाला शुक्रवारच्या विशेष सभेत चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १५१ कोटी १० लाख ३३ हजार ७८३ रुपये जमेचे व १४८ कोटी ८ लाख ३२ हजार खर्चाचे आणि ३ कोटी २ लाख १७८३ रुपये शिल्लक दाखवणारे अंदाजपत्रक सभागृहात मंजूर करण्यात आले. शहरातील तारांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणासह अनेक विकासकामांसाठी या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या शिलकी अंदाजपत्रकाला शुक्रवारच्या विशेष सभेत चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १५१ कोटी १० लाख ३३ हजार ७८३ रुपये जमेचे व १४८ कोटी ८ लाख ३२ हजार खर्चाचे आणि ३ कोटी २ लाख १७८३ रुपये शिल्लक दाखवणारे अंदाजपत्रक सभागृहात मंजूर करण्यात आले. शहरातील तारांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणासह अनेक विकासकामांसाठी या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सभेच्या सुरुवातीलाच २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात नेमकेपणाने कोणत्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे व निधीची तरतूद करण्यात आली आहे, याची माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सभागृहाला दिली. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात काही प्रमाणात दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. मात्र, अजून बरेचसे काम बाकी आहे. त्यामुळे या नाट्यगृहातील दुरुस्ती व आधुनिकीकरणासाठी येत्या आर्थिक वर्षात ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सभेच्या विषयपत्रिकेत नमूद अंदाजपत्रकाच्या रकमेमध्ये तफावत दिसून येत होती. प्रत्यक्षात ७ कोटीची शिल्लक दिसून येत आहे, याकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुदेश मयेकर यांनी लक्ष वेधेले. मात्र, अनवधानाने ती चूक झाली असून, प्रत्यक्षात तीन कोटी एवढीच शिल्लक दाखवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहरात ९ कब्रस्थाने व ३ स्मशानभूमींचे आधुनिकिकरण केले जाणार असून, लिंगायत समाजासाठी राखून ठेवलेल्या जागेत स्मशानभूमी उभारली जाणार आहे. रत्नागिरी शहरात पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. यापैकीच किल्ला परिसरातील जागेत राज्यातील ९ जलदुर्ग व राजधानी रायगड या किल्ल्यांच्या प्रतिकृती तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्प उभारली जाणार आहेत.
यावेळच्या चर्चेत नगरसेवक रोशन फाळके यांनी अग्नीशमन इमारतीच्या स्थितीची पाहणी करून सुधारणा करण्याची मागणी केली. सावरकर नाट्यगृह चालवायला दिल्यास नगर परिषदेला अधिक फायदा होईल, अशी भूमिका नगरसेवक उमेश कुलकर्णी यांनी मांडली. विविध प्रभागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात ४ कोटींची तरतूद केल्याची माहिती यावेळी नगराध्यक्ष पंडित यांनी दिली.
शहरालगतच्या पानवल येथील धरणाच्या दुरुस्तीसाठीही विकास आराखडा बनवला जाणार आहे. सभागृहातील चर्चेत सेना गटनेते बंड्या साळवी, नगरसेवक राजेश तोडणकर, समीर तिवरेकर, विकास पाटील, किशोर मोरे, निमेश नायर, सुशांत चवंडे आदींनी सहभाग घेतला.