रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणूक :सेनेविरोधात बाकी पक्ष एकच उमेदवार देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:41 AM2019-06-12T11:41:22+5:302019-06-12T11:44:16+5:30
राहुल पंडित यांनी रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट नगराध्यक्षपदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आतापासूनच गहिरे रंग भरू लागले आहेत. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित आहे.
रत्नागिरी : राहुल पंडित यांनी रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट नगराध्यक्षपदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आतापासूनच गहिरे रंग भरू लागले आहेत. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित आहे.
आता थेट निवडणुकीत सेनेला शह देण्यासाठी कुवारबाव ग्रामपंचायतीत सेना विरोधात सर्व पक्षीय आघाडीचा यशस्वी झालेला फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरला जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेनेला आघाडीशी कडवी झुंज द्यावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रत्नागिरीचे सेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी गेल्याच आठवड्यात नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रत्नागिरीचे नगराध्यक्षपद रिक्त झाले आहे. पंडित हे राजीनामा देणार व सेनेचे तालुकाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष बंड्या साळवी हे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. त्यानुसार पंडित यांनी राजीनामा दिल्यानंतर थेट नगराध्यक्ष निवडणुकीबाबत रत्नागिरीत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेचे बंड्या साळवी हेच उमेदवार असतील. त्यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केली जाईल, असे म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
दोन वर्षांपूर्वीही थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या बंड्या साळवी यांना दोन वर्षांनंतर संधी देण्याचा शब्द लेखी पत्रातून देण्यात आला होता.
त्यानुसार लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी शहरात शिवसेनेला मताधिक्य असल्याने स्थिती चांगली आहे, हे जाणूनच पक्षाने पंडित यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला, अन त्यांनी राजीनामा दिला. मात्र, पंडित यांना पाच वर्षांसाठी जनतेने निवडून दिलेले असताना त्यांचा राजीनामा का घेतला, असा सवालही काही घटकांकडून केला जात आहे.
दरम्यान, या विषयावरून शहरात रणकंदन माजले असून, सेनेला थेट नगराध्यक्ष निवडणुकीत पराभवाचे पाणी पाजायचेच, असा निश्चय काही घटकांनी केला आहे. त्यासाठी शहरातील दोन मोठे गट (घटक) एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आघाडीचे किंवा सर्व विरोधकांचे पुरस्कृत असे उमेदवार निश्चित करण्याचे मनसुबे आखले जात आहेत. त्यामध्ये सेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे नाव चर्चेत आहे.
शहरातील एक मोठा गट (समूह) सेनेच्या विरोधात सक्रीय झाला असून, आपल्या गटाचा स्वतंत्र उमेदवारही उभा करण्याची तयारी सुरू झाली आहे. पंडित यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप निवडणूक विभागाने थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम, तारीख जाहीर करणे बाकी आहे.
रंगतदार लढत
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बंड्या साळवी हे उमेदवार असतील काय, ते उमेदवार असतील तर त्यांच्याविरोधात कोण-कोण उमेदवार असतील, निवडणुकीचे डावपेच काय असतील, माजी नगराध्यक्ष दिवंगत उमेश शेट्ये यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा राष्ट्रवादीला होईल काय, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक सोपी नाही.