रत्नागिरीतील नगरवाचनालय एक लाख ग्रंथ परिपूर्तीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 04:59 PM2018-07-14T16:59:42+5:302018-07-14T17:05:13+5:30
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक लाख पुस्तक संख्या करण्याचा संकल्प केला. १०० दिवसांत ६ हजार पुस्तके जमा करण्याचे आव्हान होते. मात्र, रत्नागिरीतील वाचकप्रेमी नागरिकांनी वाचनालयाचा संकल्प तडीस नेण्यासाठी मोठा सहयोग केला आहे. जिल्हा नगरवाचनालय एक लाख ग्रंथ परिपूर्तीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती जिल्हा नगरवाचनालयाचे अध्यक्ष अॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक लाख पुस्तक संख्या करण्याचा संकल्प केला. १०० दिवसांत ६ हजार पुस्तके जमा करण्याचे आव्हान होते. मात्र, रत्नागिरीतील वाचकप्रेमी नागरिकांनी वाचनालयाचा संकल्प तडीस नेण्यासाठी मोठा सहयोग केला आहे. जिल्हा नगरवाचनालय एक लाख ग्रंथ परिपूर्तीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती जिल्हा नगरवाचनालयाचे अध्यक्ष अॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिली.
पटवर्धन यांनी सांगितले की, समाजाच्या सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि जी पुस्तक संख्या प्राप्त होण्यासाठी चार वर्षे लागली असती. ती पूर्ण करण्यासाठी जनसहयोग मिळाल्याने १०० दिवसात एक लाखांच्या पुसतकांचं स्वप्न साकार होताना दिसतंय.
विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, वकील, बँकर्स, संस्था चालक शासकीय अधिकारी, कर्मचारी, साहित्यिक तसेच काही संस्था या सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आजअखेर ९९ हजार पुस्तक संख्येचा टप्पा नगरवाचनालयाने गाठला आहे. आता एक हजार पुस्तकांची प्रतीक्षा आहे.
अनेकांनी नजीकच्या काही दिवसांत पुस्तके देण्याचे मान्य केले आहे. या सर्वांच्या सहभागाने आपले रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालय हे एक लाख ग्रंथ संपदेने सुसज्ज वाचनालय बनेल.
वाचनालयाला सहा हजार पुस्तके खरेदी करण्यासाठी किमान चार वर्षांचा कालावधी लागला असता तसेच लोकसहभागाचा मार्ग स्वीकारल्याने वाचकांनी आपल्या आवडीचे साहित्य प्रकार, पुस्तके जमा केली. त्यामुळे वाचनालयाच्या पुस्तकांची समृध्दी वाढली.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय एक लाख ग्रंथ संख्या असणाऱ्या मोजक्या वाचनालयांच्या यादीत समाविष्ट होण्याचा क्षण समीप आला आहे. रत्नागिरीच्या इतिहासाचा जागता साक्षीदार असलेले हे वाचनालय १९० वर्षे रत्नागिरीकरांच्या वाचन तृष्णा वाढवत नेवून भागवत आहे.
इतिहासातील अनेक संदर्भ वाचनालयाशी निगडीत आहेत. रत्नागिरी शहराच्या सुसंस्कृत चेहऱ्याचे रत्नागिरी जिल्हा वाचनालय हे प्रतीक आहे. अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ स्वातंत्र्यकर्मी, साहित्यिक, राजकीय नेते यांच्या सहवासाने आणि ग्रंथसंपदेने संपन्न असे हे वाचनालय नव्या युगातल्या तंत्रज्ञानाचा अंगिकार करुन दिमाखदार रुपात आजही वाचन संस्कृती जतन करीत आहे.
३१ जुलै रोजी हे वाचनालय एक लाख पुस्तक संख्या असलेले वाचनालय म्हणून ओळखले जाईल, असा विश्वासही पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.