दिवाळी खरेदीच्या धामधुमीत रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई, प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांना केला दंड
By मेहरून नाकाडे | Published: October 18, 2022 06:49 PM2022-10-18T18:49:38+5:302022-10-18T18:50:03+5:30
नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी कापडी, कागदी पिशवीचा वापर करण्याचे केले आवाहन
रत्नागिरी : दिवाळी खरेदीच्या धामधुमीत रत्नागिरी नगर परिषदेकडून प्लास्टिक बंदी संदर्भात कडक कारवाई सुरू असून शहरातून सात किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांकडून ३० हजार रुपयाच्या दंड वसूल करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र शासन प्लास्टिक बंदी अधिनियम २०१६ नुसार रत्नागिरी शहरात प्लास्टिक बंदी संदर्भात कडक कारवाई करण्यात येत आहे. नगरपरिषदेतर्फे स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांच्या वतीने उपविभागिय अधिकारी राहुल मोटे तसेच अमित लाट्ये यांनी शहरातील १५ पेक्षा जास्त आस्थापनांची पाहणी केली. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात आली. शहरातील राम आळी ते गोखले नाका या व्यापारी भागातून ७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच विविध आस्थापनांच्या माध्यमातून ३० हजार रुपयेचा दंडही आकारण्यात आला.
यापुढे शहरात सिंगल युज प्लास्टिक वापरताना आढळून आल्यास त्या आस्थापनांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सक्त सूचना करण्यात आली आहे. शहरातील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी कापडी, कागदी पिशवीचा वापर करून शहराला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्लास्टिक मुक्त करु या, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.