रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबावची मोजणी पुन्हा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:01 PM2017-12-09T17:01:04+5:302017-12-09T17:06:29+5:30
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबाव बाजारपेठेतील जागेची ११ ते १३ डिसेंबर रोजी होणारी मोजणी लांबणीवर गेली आहे. कुवारबाव व्यापारी संघाचे शिष्टमंडळ बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मुंबईत जाऊन भेटले. आमदार उदय सामंत यांनी याप्रकरणी मध्यस्थी केल्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी हिवाळी अधिवेशन काळात शिष्टमंडळाला नागपूर येथे बोलावले आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी कुवारबाव बाजारपेठेतील जागेची ११ ते १३ डिसेंबर रोजी होणारी मोजणी लांबणीवर गेली आहे. कुवारबाव व्यापारी संघाचे शिष्टमंडळ बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मुंबईत जाऊन भेटले. आमदार उदय सामंत यांनी याप्रकरणी मध्यस्थी केल्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी हिवाळी अधिवेशन काळात शिष्टमंडळाला नागपूर येथे बोलावले आहे. कुवारबाव व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष नीलेश लाड यांनी ही माहिती लोकमतला दिली.
चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जागेची मोजणी उपविभागीय कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र, कुवारबाव बाजारपेठेत ४५ मीटर जागा घेण्यासाठी मोजणीचा प्रयत्न झाला. परंतु, त्यामुळे संपूर्ण कुवारबाव बाजारपेठच उद्ध्वस्त होणार आहे.
याठिकाणी चौपदरीकरणाला विरोध नाही. मात्र, ४५ मीटरऐवजी ३० मीटर जागा चौपदरीकरणासाठी घ्यावी, अशी भूमिका कुवारबाव व्यापारी संघ व स्थानिकांनी घेतली आहे. ३० मीटर रुंदीकरणातही काही दुकाने, घरे जात आहेत. तरीही जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. मात्र, ४५ मीटर जागा घेतल्यास कुवारबाव बाजारपेठेचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे. त्यामुळेच ४५ मीटर रुंदीची जागा घेण्यास विरोध आहे.
नोव्हेंबर महिन्यात दोनवेळा कुवारबाव बाजारपेठेत चौपदरीकरणासाठीच्या ४५ मीटर जागा मोजणीचा प्रयत्न झाला. परंतु, निदर्शने, रास्ता रोको या माध्यमातून तीव्र विरोध करीत व्यापारी संघ व कुवारबाववासियांनी ही मोजणी रोखली होती. याप्रकरणी बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे व्यापारी संघाने उपविभागीय अधिकाºयांना सांगितल्यानंतर १० डिसेंबरपर्यंत येथील मोजणीला स्थगिती देण्यात आली होती.
नागपूरमध्ये चर्चेतून निर्णय?
३० नोव्हेंबर रोजी बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे रत्नागिरी दौऱ्यावर येणार होते. मात्र, हा दौरा न झाल्याने कुवारबाव व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष नीलेश लाड तसेच पदाधिकारी राजेश तोडणकर, प्रभाकर खानविलकर यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी नागपूर अधिवेशना ठिकाणी याबाबत चर्चा करूया, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. त्यानुसार ११ डिसेंबरपासून होणारी मोजणीही महामार्ग विभागाने स्थगित केल्याची माहिती पाटील यांनी व्यापारी संघाला दिल्याचे लाड म्हणाले.