रत्नागिरी : नानांनी त्यांचे काम माझ्याकडे प्रवाही केले : नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 04:13 PM2018-06-06T16:13:08+5:302018-06-06T16:16:26+5:30
स्व. नानांचे कोकण विकासाचे अपुरे काम पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली.
चिपळूण : स्व. नाना जोशी म्हणजे कोकण, अशी नानांची ओळख होती. नानांचे गुण, नानांची आदर्श पत्रकारिता याची खऱ्या अर्थाने कोकणला गरज होती, अशा शब्दात नानांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती करताना नानांनी अखेरचा प्रवाह माझ्यावर लिहिला व नानांनी त्यांचे काम माझ्याकडे प्रवाही केले, याची जाणीव मला आहे. नानांचे कोकण विकासाचे अपुरे काम पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली.
चिपळुणातील पत्रकार संघटना व सागर परिवारातर्फे माजी आमदार स्व. निशिकांत तथा नाना जोशी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित शब्द-स्मरणांजली कार्यक्रमात राणे बोलत होते. शहरातील माऊली बँक्वेट हॉलमध्ये संपूर्ण कोकणातून आलेल्या हजारो नानाप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या शब्द-स्मरणांजली कार्यक्रमात खासदार राणेंनी नानांच्या जीवनाचा आढावा घेताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले.
नानांची अनेकांच्या कामाबाबत सतत पत्र येत. नाना चिठ्ठी पाठवत व मला सतत सूचना, मार्गदर्शन करीत असत. आज संपादक म्हणून नाही, राजकारणी म्हणून नाही तर नानांचा शिष्य म्हणून येथे आलोय, असे खासदार राणेंनी सांगितले. नाना केवळ स्वत: मोठे होत गेले नाहीत तर त्यांनी आपल्यासोबत सर्वांना मोठे करीत नेले, असे राणे म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार बापुसाहेब खेडेकर, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, जयू भाटकर, महाडचे हनुमंतराव जगताप, लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, कवी अरुण इंगवले, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या संचालिका सीमा चव्हाण, अॅड. नयना पवार, शेखर निकम, सतीश खेडेकर, निहार गुढेकर, शौकत मुकादम, भास्कर जाधव, संजय रेडीज, सभापती पूजा निकम, विजय देसाई, बरकत वांगडे, भगवान शिंदे, प्रकाश कदम, दादा बैकर, मदन वेस्वीकर, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, कबीर काद्री, समीर जानवलकर, श्रीनिवास परांजपे, डॉ. प्रशांत पटवर्धन, लियाकत काद्री, रमण डांगे, उदय ओतारी, कॅ. दिलीप भाटकर, प्रशांत यादव, इब्राहिम दलवाई, अरुण इंगवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नानांचे सतत मार्गदर्शन मिळत होते. नानांचा कोकणच्या प्रश्नावर मोठा अभ्यास होता, असे आमदार सदानंद चव्हाण यांनी सांगितले. नानांची सभागृहातील भाषणं अभ्यासू व त्यांच्या विद्वत्तेची ओळख करुन देणारी असत व नानांची लक्ष्यवेधी सूचना कधीही नाकारली जात नसे. नानांना मंत्रीपद दिले गेले असते तर कोकणच्या अनेक समस्या सुटू शकल्या असत्या, असेही भास्कर शेट्ये म्हणाले. नानांच्या प्रवाहाची पुस्तके प्रकाशित व्हावीत, असे सांगून महाराष्ट्रातल्या गेल्या पन्नास वर्षांचा तो संदर्भ ठरेल, असेही डॉ. सागर देशपांडे म्हणाले. यावेळी मीनल ओक, अपर्णा बेलोसे यांनी सूत्रसंचालन केले.
...म्हणून ते मोठे झाले
नानांनी कधीही संपादक, मालक म्हणून तोरा मिरविला नाही, असे सांगत नाना मुंबईहून गावात आले व त्यांनी मोठे काम केले म्हणून ते मोठे झाले. आजची उपस्थिती त्यांच्या कार्याची पोचपावती आहे, असे मधुकर भावे म्हणाले. यावेळी त्यांनी नानांच्या पत्रकारितेतील विविध पैलू उलगडून सांगितले.
चुका झाल्याही असतील
नानांचे तैलचित्र रोहा पालिकेच्या सभागृहात लावले गेले. मात्र, नानांच्या नावाने पुरस्कार देण्याची परवानगी जोशी कुटुंबीयांनी द्यावी, अशी विनंती सुनील तटकरे यांनी केली. नानांच्या दृष्टीने माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, अशी कबुली देताना कोकणच्या समस्या सोडवण्यासाठी नानांनी काम केले.
किंमत कळली नाही
नानांची किंमत चिपळूणला, कोकणला कळली नाही. नानांना मंत्रीपद मिळाले नाही, यामुळे नानांपेक्षा कोकणचेच नुकसान अधिक झाले, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. नानांना मंत्रीपद मिळाले असते तर कोकणचा आणखीन विकास झाला असतात, असेही ते म्हणाले.