Ratnagiri: चिपळुणातील नीलिमा चव्हाण हिचा मृत्यू पाण्यात बुडून, पोलिसांच्या हाती आला शवविच्छेदन अहवाल
By अरुण आडिवरेकर | Published: August 15, 2023 08:49 PM2023-08-15T20:49:45+5:302023-08-15T20:51:49+5:30
Independence Day In Kashmir: ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी प्रतीक्षा असलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- अरुण आडिवरेकर
रत्नागिरी - ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी प्रतीक्षा असलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने तणावाखाली आत्महत्या केल्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिस आता तपास करत आहेत.
दापोली येथील एका बॅंकेत कामाला असणारी नीलिमा २९ जुलै रोजी ओमळी गावी निघाली होती. मात्र, १ ऑगस्ट रोजी तिचा दाभोळ खाडीत मृतदेह आढळला होता. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. तिच्या डोक्यावरचे केस गेल्याने तिच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला होता. पोलिसांनी याप्रकरणी १०४ साक्षीदार तपासले होते.
दरम्यान, तिच्या शरीरावर कोठेही जखमा आढळलेल्या नव्हत्या तसेच तिच्या व्हिसेरा अहवालात शरीरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तिच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा होती. हा अहवालही आता प्राप्त झाला आहे. हा अहवाल दापोली उपजिल्हा रुग्णालयात आला असून, त्यात तिचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.