‘ऐ मेरे वतन के लोगो’च्या सुरांनी पाणावले अनेकांचे डोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 04:46 PM2018-12-10T16:46:11+5:302018-12-10T16:47:11+5:30
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या दैवी स्वरांनी अजरामर केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत अंजली लिमये यांनी सुरू करताच उपस्थितांचे डोळे पाणावले.
रत्नागिरी - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या दैवी स्वरांनी अजरामर केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत अंजली लिमये यांनी सुरू करताच उपस्थित असलेले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, न्यायाधीश आनंद सामंत, तटरक्षक दलाचे कमांडट कमांडर एस. आर. पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ग्रुप कॅप्टन सतीशकुमार केंजळे (निवृत्त) यांच्यासह उपस्थित जनसमुदाय जिल्ह्यातील शहीद जवानांच्या स्मृतींनी भारावून गेला. अनेकांचे डोळे अश्रुंनी डबडबले.
सशस्त्र सेना ध्वजदिन संकलनाचा शुभारंभ तसेच पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण होते.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे निधी संकलन मोहीम राबविण्यात येते. यावेळी मान्यवरांना तसेच उपस्थितांना ध्वज प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात वीरमाता, वीरपिता, वीरनारी, वीरपुत्री तसेच सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. सतीशकुमार केंजळे यांनी प्रास्ताविक केले.