Ratnagiri news: मुख्यमंत्र्यांची सभा झाली ओके, एसटीला मिळाले उत्पन्नाचे खोके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 06:59 PM2023-03-22T18:59:22+5:302023-03-22T18:59:41+5:30

सभेची माणसे मतदार संघातीलच असल्याचे सांगण्यासाठी एस.टी. बसेसचा वापर अधिक उपयुक्त

Ratnagiri news Chief Minister meeting held OK, STs got income boxes | Ratnagiri news: मुख्यमंत्र्यांची सभा झाली ओके, एसटीला मिळाले उत्पन्नाचे खोके

Ratnagiri news: मुख्यमंत्र्यांची सभा झाली ओके, एसटीला मिळाले उत्पन्नाचे खोके

googlenewsNext

रत्नागिरी : गेला काही काळ उत्पन्नासाठी झगडणाऱ्या आणि सतत तोटा होणाऱ्या एस.टी.ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेमुळे थोडा हातभार लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेसाठी जिल्ह्याच्या पाच आगारांतून १०८ बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. या बसेसमुळे सभेला गर्दी झाली आणि एस.टी.ला तब्बल १४ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळाले. राजकारणात कुणाला खोके मिळाले असोत किंवा नसोत, पण ही सभा ओके झाल्यामुळे तोट्यातील एस.टी.ला उत्पन्नाचे खोके मिळाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांची रविवारी खेडमध्ये झालेली सभा केवळ जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे लक्ष लागलेली ठरली. ५ मार्चला उद्धव ठाकरे यांनी ज्या मैदानात सभा घेतली, त्याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार, असे जाहीर करण्यात आल्याने आधीपासूनच या सभेबाबत मोठी उत्सुकता होती. विशेषत: सभेला लोक येणार की नाही, आले तर ते उद्धव ठाकरं यांच्या सभेपेक्षा कमी असतील की जास्त याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या.

या सभेला प्राधान्याने खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील म्हणजेच आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघातील जास्तीत जास्त लोक यावेत, असे नियोजन करण्यात आले होते. त्यांच्यासह अन्य तालुक्यातील शिवसैनिकही सभेसाठी उपस्थित राहणार असल्याने या लोकांची ने आण करण्यासाठी एस. टी. बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. त्यासाठी रविवारी पाच आगारांतून १०८ गाड्या सभेसाठी सोडण्यात आल्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला साडेचाैदा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

खासगी गाड्यांसह एसटीच्या गाड्यांचा आधार घेण्यात आल्याने एस.टी.लाही थोडा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, देवरुख आगारातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. सभेसाठी वेळेवर सोडणे व सभा संंपल्यानंतर पुन्हा आणून सोडण्याची जबाबदारी होती. प्रत्येक आगारातून माणसांच्या संख्येनुसार गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. दापोली आगारातून ३१, खेड २५, चिपळूण २७, रत्नागिरी ९ व देवरुख आगारातून सहा बसेस सोडण्यात आल्या होत्या. एकूण १०८ एस.टी. बसेसमुळे रत्नागिरी विभागाला साडेचाैदा लाख रुपये मिळाले आहेत.

एस. टी. आरक्षणात असाही फायदा

कोणत्याही राजकिय सभेला बाहेरून माणसे आणल्याचा आरोप केला जातो. सभेच्या गर्दीचा दावा खोडण्यासाठी हा फंडा हमखास वापरला जातो. अशावेळी माणसे स्थानिकच होती, हे सिद्ध करायची वेळ आली तर एस.टी.चे आरक्षण अधिक उपयुक्त ठरते. बसेस कोणकोणत्या भागातून आल्या याचे रेकॉर्ड आपोआप मिळते. त्यामुळे आमच्या सभेची माणसे मतदार संघातीलच असल्याचे सांगण्यासाठी एस.टी. बसेसचा वापर अधिक उपयुक्त आहे.

Web Title: Ratnagiri news Chief Minister meeting held OK, STs got income boxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.