Ratnagiri news: कुंडी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळला मृतावस्थेत बिबट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 06:43 PM2023-03-18T18:43:03+5:302023-03-18T18:43:25+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुंडी येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मृतावस्थेत सापडल्याची माहिती शुक्रवारी (१७ मार्च) वनविभागाकडून देण्यात आली. ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुंडी येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मृतावस्थेत सापडल्याची माहिती शुक्रवारी (१७ मार्च) वनविभागाकडून देण्यात आली. हा बिबट्या १४ मार्च राेजी मृत झाल्याचे सांगण्यात आले असून, या बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही.
परिक्षेत्र वनअधिकारी वन्यजीव चांदोली (सह्याद्री व्याघ्र प्रकल्प) नंदकुमार नलावडे यांनी याबाबत खात्री केली असता बिबट्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. हा बिबट्या मृत अवस्थेत पडला असून, सर्व अवयव सुस्थितीत असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे संगमेश्वर येथील वनपाल यांना देण्यात आली. या माहितीच्या आधारे रत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी, संगमेश्वरचे वनपाल व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यावेळी देवरूखचे पशुवैद्यकीय अधिकारी कदम यांनी तपासणी करून मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे सांगितले. त्यानंतर मृत बिबट्याचे मोजमाप घेऊन त्याच ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी परिमंडळ वनअधिकारी वन्यजीव हरुन गारदी, वनरक्षक काळे, वनपाल तैफिक मुल्ला, वनरक्षक अरूण माळी, वनरक्षक राजाराम पाटील उपस्थित होते.
याबाबत अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा तपास विभागीय वनअधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे व सहायक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश सुतार, परिक्षेत्र वनअधिकारी व त्यांचे संगमेश्वरचे अधिनस्त वनपाल तैफिक मुल्ला, दाभाेळचे वनरक्षक अरूण माळी, फुणगूसचे वनरक्षक राजाराम पाटील हे करत आहेत.