रत्नागिरी : येत्या दोन दिवसात पंडित जाणार रजेवर?, नगराध्यक्षपद : साळवी यांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 03:23 PM2019-01-11T15:23:20+5:302019-01-11T15:25:21+5:30
राजीनामा घेणार, रजेवर पाठवणार, राजीनामा घेणार नाही, अशा चर्चांमध्ये अडकलेल्या रत्नागिरी नगराध्यक्ष पदाबाबत आता शिवसेनेकडून नगराध्यक्ष राहुल पंडित यांना रजेवर जाण्याची सूचना मिळाली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पंडित रजेचा अर्ज देतील, असे अपेक्षित आहे.
रत्नागिरी : राजीनामा घेणार, रजेवर पाठवणार, राजीनामा घेणार नाही, अशा चर्चांमध्ये अडकलेल्या रत्नागिरी नगराध्यक्ष पदाबाबत आता शिवसेनेकडून नगराध्यक्ष राहुल पंडित यांना रजेवर जाण्याची सूचना मिळाली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पंडित रजेचा अर्ज देतील, असे अपेक्षित आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि नूतन उपनगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांना नगराध्यक्ष पदावर बसवण्यासाठी शिवसेनेने अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. गेला महिनाभर या विषयावर जोरदार चर्चा सुरू होती. पंडित यांचा राजीनामा घेणार की, त्यांना रजेवर पाठवणार याबाबतची निश्चित भूमिका खासदार विनायक राऊत किंवा आमदार उदय सामंत यांनी घेतली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुखांकडे सादर केला होता. मात्र, हा राजीनामा पक्षाकडून स्वीकारला जाणार नसल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
अचानक काही घडामोडी घडल्या आणि साळवी उपनगराध्यक्ष झाले. आता पंडित यांना रजेवर जाण्याची सूचना जिल्हाप्रमुखांनी केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे पंडित येत्या दोन दिवसात आपला राजीनामा प्रशासनाकडे सादर करणार आहेत, असे समजते. त्यामुळे साळवी यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.