रत्नागिरी : शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत : निरंजन डावखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:46 PM2018-05-05T14:46:52+5:302018-05-05T14:46:52+5:30
शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांच्या सर्वांगिण हितासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले.
दापोली : शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांच्या सर्वांगिण हितासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्यस्तरीय वार्षिक शैक्षणिक कृतीसत्र दापोली येथील नवभारत छात्रालयात आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, राजेश क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच रत्नागिरी महामंडळाचे राज्याध्यक्ष विजयसिंह गायकवाड, विद्या समिती राज्याध्यक्ष संदीपान मस्तूद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डावखरे पुढे म्हणाले की, शिक्षकांकडून समाज घडविण्याचे पवित्र काम होत असून, शिक्षकांना केवळ विद्यादानाचे काम करु द्यायला हवे. परंतु, शासनाकडून शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली जात असल्याने शिक्षणक्षेत्राचे मोठे नुकसान होऊ शकते.
मुख्याध्यापकांना काम केले तरी त्रास होतोय. काम नाही केले तरीही त्रास होतोय. संस्थेला सांभाळायचे की शिक्षकांना सांभाळायचे की शासनाचा आदेश सांभाळायचा या अडचणींना मुख्याध्यापकांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्याध्यापकांवरील कामाचा ताण वाढत असून, अशावेळी मुख्याध्यापकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.
अशैक्षणिक कामे शिक्षकांना जबरदस्तीने करायला लावण्यापेक्षा ही कामे गरजू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना द्यावीत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करीत आहोत. अधिवेशन काळात याविषयीचा प्रश्न उपस्थित करुन शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पाडू, असेही डावखरे यांनी सांगितले.
निरंजन डावखरे पुढे म्हणाले की, शिक्षकांवर अशैक्षणिक कामे जबरदस्तीने लादली गेली तर त्यातून समाधानकारक ह्यरिझल्टह्ण मिळेलच, असे नाही. त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी अशैक्षणिक कामे बंद व्हायला हवीत, असे डावखरे म्हणाले.
शिक्षणक्षेत्रातील अनुकंपाखालून पदे भरण्यासंदर्भात आपण वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच शासन एक परिपत्रक काढून नोकरभरती करेल. शिक्षकांना जुनी पेन्शन लागू व्हावी, यासाठीही आपला पाठपुरावा सुरु आहे.
समाज घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होऊ नये यासाठी आपण वारंवार सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. शिक्षणक्षेत्राच्या हितासंबंधित निर्णयांसाठी आपला लढा यापुढेही सुरुच राहील, असे डावखरे यावेळी म्हणाले.
शैक्षणिक क्षेत्रात बदल
कोकणात अतिशय चांगले शैक्षणिक वातावरण आहे. येथील शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. कोकणातील शैक्षणिक दर्जा राज्याच्या तुलनेत चांगला आहे. परंतु, काही शाळांना डिजिटल होण्याकरिता शासनाच्या मदतीची गरज आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. परंतु, शासन मात्र दररोज नवनवीन परिपत्रके काढून शिक्षणक्षेत्रातील संभ्रम वाढवत आहे.