रत्नागिरी : गुजरातनंतर आता गुहागरच्या बंदरात जहाज तोडणी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:44 PM2018-05-07T18:44:44+5:302018-05-07T18:44:44+5:30
गुहागरातील काताळे बंदरात आता लवकरच जहाज दुरुस्ती आणि जहाज तोडणीचा प्रकल्प उभा राहणार आहे. देशातील महत्त्वाच्या जहाज तोडणी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प ठरणार आहे. काताळे येथील ७.२५ एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभा राहणार आहे.
विहार तेंडुलकर
रत्नागिरी : मरीन सिंडीकेट प्रा. लि. या कंपनीतर्फे गुहागरातील काताळे बंदरात आता लवकरच जहाज दुरुस्ती आणि जहाज तोडणीचा प्रकल्प उभा राहणार आहे. देशातील महत्त्वाच्या जहाज तोडणी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प ठरणार आहे. काताळे येथील ७.२५ एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभा राहणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेला पसरलेल्या निळ्याशार अरबी समुद्रात झेपावणाऱ्या मोठमोठ्या जहाजांना आता रत्नागिरीत शेवटचा विसावा घेता येणार आहे. जयगड खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर काताळे हे गाव वसलेले आहे. याचठिकाणी जहाज दुरुस्ती आणि जहाज तोडणीचा प्रकल्प येत्या काही वर्षात उभारला जाणार आहे.
गेली अनेक वर्षे समुद्री क्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या मे. मरीन सिंडीकेट प्रा. लि. या कंपनीने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डशी करार केला आहे. येथील बहुउद्देशीय टर्मिनलवर मालवाहतूक आणि जहाज दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे आणि यासाठी साडेतीन हजार चौरस मीटर इतके जलक्षेत्र भाडेपट्टीवर मंजूर झाले आहे. या टर्मिनलच्या जवळच जहाज तोडणी सुविधा उभारण्यात येणार आहे. मालवाहतुकीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या जेटीनजीकच एक स्वतंंत्र प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे.
मालवाहतूक आणि जहाज दुरुस्तीसाठी यापूर्वी वापरात असलेल्या जलक्षेत्राजवळच लहान जहाजांसाठी जहाज तोडणी सुविधा नियोजित आहे. १५० मीटर लांब आणि ५ मीटर ड्राफ्टच्या जहाजांची तोडणी याठिकाणी करण्याचे नियोजन आहे. याठिकाणी वर्षाला १० ते १५ लहान जहाजे किंव बार्जेस सुटी करून ती तोडण्यात येणार आहेत.
ज्याठिकाणी जहाज तोडणी नियोजित आहे, त्याठिकाणी सध्या टर्मिनल असून, तेथे दरवर्षी कमाल २ लाख टन एवढी मालवाहतूक करण्याचे नियोजन आहे आणि या प्रकल्पाची अंदाजे किंमत ही २.४३ कोटी एवढी असणार आहे.
जहाजांना किनाऱ्यावर बांधून ठेवण्यासाठी खुंटे तयार करण्यात येणार आहेत. भाग सुटे करण्यासाठी येणारी लहान जहाजे आणि बार्जेस या टर्मिनलच्या उथळ पाण्यामध्ये खेचून घेण्यात येतील.
जहाज तोडणीसाठी ५ हजार चौरस मीटर जलक्षेत्र वापरण्यात येणार आहे. जहाज तोडणी करताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये, यासाठीची उपाययोजना मे. मरीन सिंडीकेट या कंपनीने प्रशासनाकडे अहवालाद्वारे सादर केली आहे.
लवकरच जनसुनावणी
या प्रकल्पाबाबत लवकरच जनतेच्या उपस्थितीत जनसुनावणी आयोजित करण्यात येणार असून, यावेळी उपस्थितांना प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती तसेच त्यांच्या विविध शंकांचेही निरसन करण्यात येणार आहे.
लहान जहाजांची दुरुस्ती
लहान जहाजांच्या दुरुस्तीचा प्रश्न हा ऐरणीवर असतो. मोठ्या जहाजाच्या दुरुस्तीच्या ठिकाणी या जहाजांना घेतले जात नाही. त्यामुळे लहान जहाजांसाठी तरंगत्या सुक्या गोदीसह दुरुस्तीची सुविधा देण्यात येणार आहे.
४२ गावांचा अभ्यास
प्रकल्पाबाबत अहवाल तयार करताना मे. मरीन सिंडीकेट या कंपनीने परिसरातील ४२ गावांचा अभ्यास केला आहे. या क्षेत्रात ९ हजार ७४७ कुटुंबांमध्ये ३७ हजार ४०४ एवढी लोकसंख्या वसलेली आहे.
२० ते २५ वर्षांचं आयुष्य
साधारणत: जहाजांचे आयुष्य हे २० ते २५ वर्षे यादरम्यान असते. त्यानंतर ही जहाजे वापरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते तसेच ते असुरक्षितही असते. अशी जहाजे भंगारात तोडली जातात.
कोकण किनाऱ्यावर काही ठिकाणी अशी जुनी जहाजे तशीच विनावापर टाकून दिली जातात. या जहाजांची तोडणी करण्यासाठी याठिकाणी आजपर्यंत प्रकल्पच नव्हता. हा प्रकल्प झाल्यानंतर ही जहाजे कोकणात मोडीत काढता येतील.
कारखाने तुरळक
गुजरातमधील अलंग येथे फार मोठ्या प्रमाणात जुनी जहाजे तोडण्याचा व्यवसाय चालतो. याठिकाणी देशी, विदेशी जहाजेही तोडण्यासाठी येतात. रे रोड-माझगाव परिसरातील दारुखाना विभागात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या क्षेत्रावरही काही जुनी जहाजे तोडण्यात येतात. मात्र, दारुखाना येथील ही सुविधा आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गोवा आणि कोकणात जहाज तोडण्याची सुविधा नाही. त्यामुळे काताळे येथील हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रकल्पाची आवश्यकता
भारतातील ४५ हजार जहाजांपैकी सुमारे सातशे जहाजे दरवर्षी सेवेतून मुक्त होतात. त्यातील काही जहाजे ही तोडणीसाठी पुरेसे कारखाने नसल्याने तशीच पडून राहतात. जहाज तोडल्यानंतर उपलब्ध झालेल्या लोखंडांपैकी ९५ टक्के लोखंड हे पुनर्वापरासाठी उपलब्ध होते. भरतीच्यावेळी जहाजे किनारपट्टी भागात आणायची आणि ओहोटी झाल्याक्षणी ही जहाजे तोडायची, असे या व्यवसायाचे स्वरुप असते.
सुरक्षितता जपणार
विविध ठिकाणांहून येणाऱ्या जहाजांवरून कोणत्याही धोकादायक वस्तूची वाहतूक केली जात नाही, यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जहाज बंदराबाहेर समुद्रात असतानाच त्याची तपासणी होईल आणि धोकादायक सामान आढळल्यास बंदरावर प्रवेश नाकारण्यात येणार आहे. प्रकल्पस्थळी आणल्यानंतरही जहाजाची पुनर्तपासणी केली जाणार आहे.