रत्नागिरी : प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 04:12 PM2018-12-25T16:12:43+5:302018-12-25T16:14:25+5:30
युती नाही झाली तर प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी विधानसभा निवडणूकही आपण लढवू, असे भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
रत्नागिरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. लवकरच तशी घोषणा होणे अपेक्षित आहे. युती झाली तर शिवसेनेचे उमेदवार सध्याच्या मताधिक्यापेक्षा अधिक मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल. मात्र, युती नाही झाली तर प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी विधानसभा निवडणूकही आपण लढवू, असे भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
रत्नागिरी दौऱ्यात विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ होत नाही, तोवर रत्नागिरीचे केंद्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा निर्णय झाला आहे. स्वतंत्र विद्यापीठाचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर गेला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असे ते म्हणाले.
राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. त्यासाठी केंद्राकडे मदतीची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तसेच रत्नागिरी विधानसभा मतदार संघासाठी आपण इच्छुक आहोत. जर युती झाली तर या दोन्ही ठिकाणी जो कोणी उमेदवार असेल तर त्याला आधीच्या मतांपेक्षा अधिक मतांनी निवडून आणेन आणि जर युती झाली नाही तर खासदार राऊत किंवा आमदार सामंत यांच्याविरोधात निवडणूक लढवेन, असे ते म्हणाले.
युती झाली तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठपैकी चार जागांची मागणी भाजपकडून केली जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपच्या संपर्कात आहेत आणि लवकरच बदल दिसेल, असेही ते म्हणाले.
उमेदवारीची घोषणा राज्यस्तरावरूनच होते!
जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दोन दिवसांपूर्वी स्वत:सह जिल्ह्यातील अन्य भाजप उमेदवारांची नावे जाहीर केली होती. ती अंतिम नावे आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना आमदार लाड म्हणाले की, भाजपमध्ये काही शिस्त आहे. इच्छुक म्हणून कोणीही आपले नाव जाहीर करू शकतो. पण अंतिम उमेदवारांची नावे राज्यस्तरावरील कोअर कमिटीकडूनच जाहीर होतात. त्यासाठी काही प्रक्रिया असतात. समिती गठीत होते. त्यानंतरच नावे निश्चित होतात.
अजून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत अशी कोणतीही नावे अंतिम झालेली नाहीत अथवा जाहीर झालेली नाहीत. माने यांच्याशी आपला संपर्क झाला नसल्याने त्यांच्या वक्तव्याची आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.