Ratnagiri: चिपळुणात दुर्मिळ पोपटाची तस्करी प्रकरणी, मौजे कोंढेमाळ येथील एकजण वनविभागाच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 10:07 PM2023-08-15T22:07:25+5:302023-08-15T22:07:42+5:30
Ratnagiri: चिपळूण तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांची तस्करी केली जात होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मंगळवारी एकास ताब्यात घेतले आहे.
- संदीप बांद्रे
चिपळूण - तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांची तस्करी केली जात होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मंगळवारी एकास ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडून 'तुईया' या प्रजातीच्या पोपटाची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ असे एकूण १२ पक्षी आढळून आले आहेत.
या प्रकरणी जितेंद्र धोंडू होळकर, (रा.कोंढेमाळ, चिपळूण) याला ताब्यात घेतले आहे. तो विशिष्ट प्रजातीचे पोपट पकडून विक्री करत असलेबाबतची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश्री कीर, वनपरिमंडळ अधिकारी दौलत भोसले, उमेश आखाडे, सुरेश उपरे व वनरक्षक राजाराम शिंदे, अश्विनी जाधव इत्यादी वनविभागाचे अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जितेंद्र होळकर याच्या कोंढेमाळ येथील राहत्या घरी व गुरांच्या गोठ्यामध्ये अचानक धाड टाकली.
त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये पहाणी केली असता घराशेजारील प्रभाकर जिवा करंजकर यांच्या लाकडाच्या खोपटीत दोन पिंजऱ्यामध्ये पोपट प्रजातीमधील 'तुईया' (प्लम हेडेड पॅराकीट) या प्रजातीची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ पक्षी आढळून आले. या पक्षांबाबत जितेंद्र होळकर याच्याकडे विचारणा केली असता हस्तगत करण्यात आलेल्या दोन पिंजऱ्यातील एकूण १२ पोपट हे माझेच आहेत. मी गुरे चारण्यासाठी गावाजवळील डोंगरावर गेलो असताना लाकडाच्या डोलीतून सुमारे ४-५ महिने व १ वर्षापूर्वी ताब्यात घेतले आहेत. तसेच यापुर्वी मी १० ते १२ जणांना पोपट विकले असल्याचे सांगितले. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ सुधारणा २०२२ अन्वये वनपाल चिपळूण यांचेकडील प्रथम गुन्हा रिपोर्ट क्र. ०२/२०२३ अन्वये जितेंद्र धोंडू होळकर यांचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोपटांची विक्री केल्यास कोणती शिक्षा?
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ व सुधारणा २०२२ च्या कायद्यानुसार पोपटांची विक्री करणे किंवा जवळ बाळगणे या करीता तीन वर्षा पर्यंतच्या कारावासाची शिक्षा किंवा १ लक्ष दंडाची अथवा दोन्ही शिक्षेची तरतुद आहे. तरी वन विभागाकडून आवाहन करणेत येते की, कोणीही वन्यप्राण्यांची शिकार, विक्री, त्यांच्या नैसर्गिक अधिवासास इजा पोहचविणे किंवा जवळ बाळगणे हा गुन्हा असल्याने असे आढळून आल्यास संबधीता विरूध्द तात्काळ कारवाई करणेत येईल.