रत्नागिरी : झाड तोडताना जमिनीवर आदळून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:29 PM2018-05-17T18:29:45+5:302018-05-17T18:29:45+5:30
झाड तोडत असताना फांदी अंगावर पडेल, या भीतीने पळणारा जोरात जमिनीवर आदळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला.
रत्नागिरी : झाड तोडत असताना फांदी अंगावर पडेल, या भीतीने पळणारा जोरात जमिनीवर आदळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला.
विलास शिवराम कांबळे (५३, बौध्दवाडी, हातखंबा) असे मृत व्यक्तीचे नाव असून, सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना हातखंबा - बौध्दवाडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात खबर देणारे सुयोग नंदकुमार कांबळे यांचे चुलते विलास कांबळे व हेमंत कांबळे हे बहिणीचे लग्न असल्याने साफसफाईचे काम करीत होते. त्यावेळी नजीकचे झाड तोडण्याचे काम सुरू होते. झाडाला बांधलेला दोर एका बाजूला विलास कांबळे व दुसऱ्या बाजूला अजित कांबळे यांनी पकडला होता.
झाड अंगावर पडेल, या भीतीने विलास कांबळे यांनी दोरी सोडून दिली व धावत सुटले. त्यावेळी तोल जाऊन जमिनीवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी त्यांना रक्तस्त्रावही झाला होता. त्यामुळे काही ग्रामस्थांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चित्रा मढवी करीत आहेत. सध्या पाऊस जवळ आल्याने ग्रामीण भागात पावसाळी कामे सुरु झाली आहेत. त्यातूनच हा प्रकार घडला.