रत्नागिरी-ओवशाच्या सुपाला सोन्याचा भाव

By admin | Published: August 26, 2014 10:42 PM2014-08-26T22:42:21+5:302014-08-26T22:53:04+5:30

बुरूड व्यवसायाला तेजी

Ratnagiri-Ovsha's gold price of gold | रत्नागिरी-ओवशाच्या सुपाला सोन्याचा भाव

रत्नागिरी-ओवशाच्या सुपाला सोन्याचा भाव

Next

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. यावर्षी गौरी पूर्वा नक्षत्रावर येत असल्याने सर्वत्र गौरी पूजन व नवविवाहितांचे ओवसे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाचशे ते सहाशे रूपये दराने ओवशाची सूपे विकण्यात येत असल्यामुळे बुरूड व्यवसायाला तेजी आलेली दिसून येते.मोठे सूप व लहान चार शिपल्या मिळून पाच सुपांचा सेट नवविवाहितांच्या ओवशांसाठी विकत घेतला जातो. फळे, पाच प्रकारचे गोड पदार्थ, पान सुपारी, नारळ सुपात ठेवून गौरी पूजन केले जाते. नवविवाहिता माहेरहून ओवसा तयार करून सासरी घेऊन घेतात. माहेरी व सासरी दोन्ही ठिकाणी ओवसा देण्यात येतो. ओवसा दिल्यावर विवाहितेला भेटवस्तू साडी किंंवा पैसे तसेच ओटी देण्यात येते. गतवर्षी गौरी पूर्वा नक्षत्रात आल्या होत्या. यावर्षीदेखील पूर्वा नक्षत्रात आल्याने ओवसे केले जाणार
आहेत.ओवशासाठी सुपांची विक्री सुरू आहे. रोखीचे पैसे मिळत असल्याने या व्यवसायात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे एरव्ही अवकळा असलेल्या बुरूड व्यवसायाला या महिनाभरात का होईना, परंतु तेजी आली आहे. ओवशासाठी सुपांना सोन्याचा भाव आला आहे. पारंपरिक बुरूड व्यवसाय करणारी मंडळी बांबू कापून त्यापासून पट्ट्या तयार करून सुपे तयार करतात. मोठे सूप वळण्यास जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ छोटी सूपे तयार करण्यास लागतो. मोठी सूपे सर्रास विकत मिळतात. मात्र, छोटी सूपे किंवा शिपल्या विणणारी मंडळी आता संख्येने कमी झाली आहेत. त्यामुळे या व्यवसायातील दलाल मंडळी घाऊक स्वरूपात गुजरात राज्यातून सूपे विकत आणतात. ५० ते ६० रूपयांमध्ये हे सूप विकत मिळते. हजारो सूपे एकाच वेळी खरेदी करून आणली जातात. शिपल्या तेथे मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागात बुरूड व्यवसाय करणाऱ्या मंडळींकडून विकत घेतले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील मंडळींनादेखील मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. दलाल मंडळी ग्रामीण भागातून अल्प किमतीत शिपल्या खरेदी करून पाच सुपांचा सेट ५०० ते ६०० रूपयांना सहज विकताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)

ओवशांसाठी सूपे लागत असल्याने रोखीने ती खरेदी केली जातात. शिवाय दरवर्षी ओवसे येत नसल्यामुळे यावर्षी अधिकाधिक ओवसे उरकण्यात येणार आहेत. त्यामुळे सुपांना विशेष मागणी दिसून येत आहे. गणेशोत्सव घरोघरी साजरा करण्यात येतो. नवविवाहितांचे ओवसे करण्याची प्रथा असल्यामुळे ओवशांच्या सुपांना अधिक मागणी होत आहे. मोठी सूपे गुजरातमध्ये स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. परंतु शिपल्या केवळ आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध होतात. आंबेशेत, देवरूख, पोमेंडी, राजापूर, चिपळूण येथून आणली जातात. रोखीने व्यवहार होत असल्यामुळे सणासुदीच्या काळात दोन पैसे मिळतात.
ए. एस. पवार, रत्नागिरी

Web Title: Ratnagiri-Ovsha's gold price of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.