पोषण आहारावरून रत्नागिरी पंचायत समितीत हंगामा, सदस्य आक्रमक, सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:59 PM2018-09-12T13:59:46+5:302018-09-12T14:05:32+5:30

निकृष्ट शालेय पोषण आहाराच्या विषयावरून पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी हंगामा केला.

Ratnagiri Panchayat Samiti commits a ruckus, member aggressor, meeting with nutrition | पोषण आहारावरून रत्नागिरी पंचायत समितीत हंगामा, सदस्य आक्रमक, सभा गाजली

पोषण आहारावरून रत्नागिरी पंचायत समितीत हंगामा, सदस्य आक्रमक, सभा गाजली

googlenewsNext
ठळक मुद्देपोषण आहारावरून रत्नागिरी पंचायत समितीत हंगामा, सदस्य आक्रमक, सभा गाजली, पोषण आहाराच्या गोदामाबाबत अधीक्षकच अनभिज्ञ

रत्नागिरी : निकृष्ट शालेय पोषण आहाराच्या विषयावरून पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी हंगामा केला.

धान्याच्या गोदामाची पाहणी करण्याची सर्वच सदस्यांनी मागणी करून प्रत्यक्ष पाहाण्यास ते निघाले. मात्र, दर महिन्याला आपण धान्य तपासणी करतो, अशा थापा देणाऱ्या पोषण आहार अधीक्षकालाच हे गोदाम कुठे आहे, हे माहीत नसल्याचे कळताच शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.

शालेय पोषण आहारासाठी आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी वितरित केलेले धान्य वापरू नये तसेच मुख्याध्यापकांनी खुल्या बाजारातून धान्य घेऊन मुलांना पोषण आहार शिजवून द्यावा, असा निर्णय आज शिक्षण समितीत घेण्यात आला.

पंचायत समितीची मासिक सभा सभापती विभांजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शामराव पेजे सभागृहात झाली. यावेळी महावितरण, ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, आरोग्य, आदी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

उपसभापती शंकर सोनवडकर, सदस्य गजानन पाटील, ऋषिकेश भोंगले, मेघना पाष्टे, उत्तम सावंत यांच्यासह अन्य सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याचवेळी निकृष्ट शालेय पोषण आहारावरून सभा गाजली.

पंचायत समितीचे सदस्य गजानन पाटील यांनी कुवारबाव आणि मिरजोळे शाळेतील मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारीनुसार पोषण आहाराचे निकृष्ट धान्य शाळांना वाटप झाल्याची माहिती दिली.

याचा जाब पोषण आहार अधीक्षक संतोष कटाळे यांना विचारण्यात आला. परंतु त्यांनी १५ दिवस आपण रजेवर असल्याचे सांगितले. मात्र, पाटील यांनी ही रजा अधिकृत आहे का? असे विचारले असता ते निरूत्तर झाले.

पाटील यांनी वितरित केलेले धान्य अत्यंत निकृष्ट आहे. हरभऱ्यात काड्या, तसेच मूगडाळीत टोके पडलेली असल्याची माहिती दिली. जनावरेही खाणार नाहीत, असे हे धान्य असून, हा मुलांच्या जीविताशी चाललेला खेळ आहे, असे पाटील यांनी सांगितले. याबाबत पाहणी केली का, अशी कटाळे यांच्याकडे विचारणा करता त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

कोल्हापूरचे ठेकेदार रामदास जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांना गोडावूनमध्ये धान्य शिल्लक नसून, कामगार गावी गेल्याचे सांगितले. त्यामुळे त्यातील भ्रष्टाचार सर्वांच्या निदर्शनास आला. त्यामुळे आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी वितरित धान्य वापरू नये, मुख्याध्यापकांनी खुल्या बाजारातून धान्य घेऊन मुलांना पोषण आहार शिजवून द्यावा, असा निर्णय या सभेत घेण्यात आला.

गोडावून केले सील

सर्व सदस्य उद्यमनगर येथील गोडावूनची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र, तेथील गोडावूनला टाळे असल्याने पाहणी करता आली नाही. परंतु, गोडावूनच्या पाठीमागच्या बाजूने आतमध्ये पाहिले असता धान्याची पोती मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसले. ठेकेदार आणि अधीक्षक दिशाभूल करत असल्याने हे गोडावून सील करण्यात आले आहे.

ठेका रद्द करण्याची मागणी

मंगळवारी शिक्षण समितीच्या बैठकीतही शालेय पोषण आहाराचा मुद्दा चर्चेला घेण्यात आला. यावेळी शिक्षण सभापती बेटकर यांनी अधीक्षक संतोष कटाळे यांना फैलावर घेतले. काही दिवसांपूर्वी खेड येथे ३३ मुलांना आहारातून विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच निकृष्ट धान्य पुरवठ्यावरून ते संतापले.

या ठेकेदारावर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करत नवा ठेकेदार नेमावा आणि या ठेकेदाराचे कोणतेही बिल पास करू नये, असा ठराव करण्यात आला. यावेळी येथे उपस्थित सदस्य बाळकृष्ण जाधव यांनीही कटाळे यांना फैलावर घेतले.

शिक्षणाधिकारी यांच्याकडून आॅगस्टमध्येच पत्र

शिक्षणाधिकारी देविदास कुल्हाळ आणि शिंदे यांनी २७ आॅगस्ट रोजी या धान्याची तपासणी केली असल्याचे सांगितले आणि हे धान्य निकृष्ट असल्याचे ठेकेदाराला पत्र पाठवले आहे, असेही सांगितले.

Web Title: Ratnagiri Panchayat Samiti commits a ruckus, member aggressor, meeting with nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.