रत्नागिरी : पॅसेंजर रत्नागिरीची की दक्षिणेची?, स्वतंत्र गाडी कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 04:51 PM2018-09-20T16:51:57+5:302018-09-20T16:54:21+5:30
रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी स्वतंत्र रत्नागिरी - दादर पॅसेंजर ही एकमेव गाडी तीन वर्षांपूर्वी रत्नागिरीकरांकडून हिरावून घेण्यात आली.
रत्नागिरी : रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी स्वतंत्र रत्नागिरी - दादर पॅसेंजर ही एकमेव गाडी तीन वर्षांपूर्वी रत्नागिरीकरांकडून हिरावून घेण्यात आली.
रत्नागिरी - मडगाव असे गोंडस नाव देत ही गाडी मडगावपर्यंत विस्तारित करण्यात आली. त्यामुळे मडगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य प्रवासी या गाडीतून रत्नागिरीसाठी नव्हे; तर मुंबईत जाण्यासाठी नेहमीच जागा अडवून येतात. रत्नागिरीकरांना गाडीत जागाच मिळत नाही. त्यामुळे ही गाडी रत्नागिरीची की दक्षिणेची, असा संतप्त सवाल आता रत्नागिरी जिल्हावासीयांमधून केला जात आहे.
रेल्वे मंत्र्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची तातडीने दखल घेऊन पूर्वीप्रमाणेच रत्नागिरी - दादर - रत्नागिरी अशी गाडी कायम न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा आता जिल्हावासीयांमधून दिला जात आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (१८ सप्टेंबर) पहाटे ५.३० वाजता रत्नागिरीहून दादरकडे जाणारी रत्नागिरी - दादर पॅसेंजर मध्यरात्रीच मडगाववरून येताना मडगाव व सिंधुदुर्गमधील प्रवाशांनी खचाखच भरून आली होती. रत्नागिरी स्थानकापर्यंतच ही गाडी असेल तर मडगावहून रत्नागिरीपर्यंत येणाऱ्या प्रवाशांना रत्नागिरी स्थानकात उतरवून गाडी अन्यत्र का उभी केली जात नाही.
मडगाव, सिंधुदुर्गवरून येणाऱ्या प्रवाशांना २ ते ३ तास या गाडीतच बसून राहण्याची सुविधा का दिली जात आहे, असा संतप्त सवाल आता रत्नागिरीकरांमधून केला जात आहे.
मडगाव, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अन्य गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे रत्नागिरी - दादर पॅसेंजर कायम सुरू ठेवून रात्रीच्या वेळेस रत्नागिरीहून आणखी एक नवीन पॅसेंजर सुरू करून रत्नागिरीची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
मडगाववरून दररोज कोकणकन्या व अन्य गाड्या मुंबईकडे जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून तुतारी एक्सप्रेस व सावंतवाडी-दिवा पॅसेंजर या स्वतंत्र गाड्या उपलब्ध आहेत. अन्य गाड्यांचाही पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध आहे.
असे असतानाही रत्नागिरीसाठी एकमेव स्वतंत्र असलेली रत्नागिरी - दादर ही गाडी मडगावपर्यंत विस्तारित करण्यात नेमका कोणाचा हात आहे, कोणाचा राजकीय डाव आहे, खासदार विनायक राऊत, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व अन्य स्थानिक आमदार याबाबत गप्प का आहेत, असा सवाल आता उपस्थित केले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यावर अन्यायच
रेल्वेचे मुख्य कार्यालय रत्नागिरीत करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार रत्नागिरी स्थानकाची मुख्यालयाच्या ठिकाणचे स्थानक म्हणून बांधणी झाली. प्रत्यक्षात कोकणच्या पलिकडे बेलापूर येथे मुख्य कार्यालय नेऊन रत्नागिरीवर अन्याय झाला. त्यानंतर रत्नागिरी विभागीय कार्यालय देऊन त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे रेल्वेकडून सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप रत्नागिरीकर करीत आहेत.
पॅसेंजरला ६ तास उशिर?
मंगळवारी दादर पॅसेंजर प्रवासी गोंधळामुळे ३ तास रखडली. खेडपर्यंत ही गाडी ४ तास विलंबाने धावत होती. दादरला जाईपर्यंत ही गाडी ५ ते ६ तास उशिराने पोहोचणार हे स्पष्ट झाले. जागाच न मिळालेल्या प्रवाशांची अन्य गाड्यांमधून जाण्याची सोय करण्यात आली.
फसवा युक्तिवाद
रत्नागिरीसाठी दादर पॅसेंजर ही एकमेव स्वतंत्र रेल्वेगाडी देण्यात आली. ही गाडी रत्नागिरी स्थानकातच प्रवाशांनी पूर्ण भरते. या गाडीला रत्नागिरीकरांची गर्दी असते. असे असताना रत्नागिरीकरांच्या हक्काची असलेली ही गाडी रत्नागिरी - दादर - मडगाव पॅसेंजर या नावाने तीन वर्षांपासून सुरू करण्यात आली. त्याला आक्षेप घेतल्यानंतर रत्नागिरी - दादर ही स्वतंत्र गाडी आहे व रत्नागिरी - मडगाव ही स्वतंत्र गाडी आहे. या फेऱ्यांसाठी एकच गाडी वापरली जात असली तरी वेळांमध्ये २ ते ३ तासांचा फरक आहे, असा युक्तिवाद केला जात आहे.
अधिकारी खेड, चिपळूणला घाबरतात!
रत्नागिरी - दादर पॅसेंजरमध्ये जागा न मिळालेले व राखीव बोगींमधून उतरविण्यात आलेले प्रवासी यांच्या संतापाचा बांध प्रसारमाध्यमांपुढे फुटला. रत्नागिरीसाठी स्वतंत्र गाडी सोडा, अशी मागणी केली. कोकण रेल्वेचे अधिकारी चिपळूण, खेडला घाबरतात.
आम्ही रत्नागिरीत तिकीट घेऊनही आम्हाला गाडीतून उतरविण्यात आले. हा अन्याय आहे. आम्ही रत्नागिरीकर अधिकाऱ्यांना शांत वाटतो काय, हे यापुढे खपवून घेणार नाही, असा इशाराही बोलताना दिला.
रत्नागिरी-दादर-रत्नागिरी ही आधी सुटणारी पॅसेंजर रेल्वे मडगावपर्यंत विस्तारित केल्याने मडगाव, सिंधुदुर्गमधून प्रवासी भरून येत असून, रत्नागिरीच्या प्रवाशांना गाडीत जागाच मिळत नाही. यावरून मंगळवारी पहाटे रत्नागिरी स्थानकात गोंधळ झाला. याची दखल खासदार विनायक राऊत यांनी घेतली असून, अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनानंतर खासदार राऊत हे नवी दिल्लीत गेल्यावर ही गाडी पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेणार आहेतच, याशिवाय रत्नागिरीसाठी दुसरी गाडी सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार आहेत.
- उदय सामंत,
अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधीकरण