रत्नागिरी : गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:49 PM2018-09-21T15:49:35+5:302018-09-21T15:52:03+5:30
पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबई, पुणे महानगरातील चाकरमान्यांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसना प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र मंडणगडात दिसत असले तरी मुबलक गाड्या व चालक - वाहक असले तरी गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज झाले होते.
मंडणगड : पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबई, पुणे महानगरातील चाकरमान्यांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसना प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र मंडणगडात दिसत असले तरी मुबलक गाड्या व चालक - वाहक असले तरी गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज झाले होते.
मंडणगड बसस्थानक परिसर गाड्या व प्रवाशांच्या गर्दीने फुलला आहे. जादा वाहतुकीसाठी विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून, प्रवाशांना माईकद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. परतीच्या या प्रवासासाठी आगार व्यवस्थापनाने मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे, नालासोपारा, दहीसर या मार्गावर जादा गाड्या सोडल्या.
आयत्यावेळी प्रवाशांचे भारमान वाढल्यास त्वरित गाडी सोडण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे. बसस्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेऊन खासगी वाहतूक व्यावसायिकांनी बसस्थानकाच्या आवारात वाहने उभी करू नये व त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केळशी, वेळास, आंबडवे या परिसरातून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्याच्या नियोजनाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.