रत्नागिरी -पावसाने शेतीला तारले
By Admin | Published: August 28, 2014 09:13 PM2014-08-28T21:13:21+5:302014-08-28T22:24:44+5:30
स्थिती समाधानकारक : उत्पादन मात्र घटण्याची शक्यता
रत्नागिरी : पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील भातशेती धोक्यात आली होती. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता. बहुतांश काही ठिकाणी भातरोपांची वाढ खुंटलेली दिसून येत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे भात, नागली, तृणधान्य, भाजीपाला शेतीला तारला आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाला उशिराने सुरूवात झाल्याने शेतीची कामे खोळंबली होती. मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतीची स्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात भात, नागली, तृणधान्य व भाजीपाला लागवड प्रक्रिया करण्यात आली आहे. पैकी ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तसेच २ हजार ९३६ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. तृणधान्य ४१६ हेक्टर क्षेत्रावर, कारळा ३३, भाजीपाला ६१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आला आहे.
लागवडीच्या कालावधीतही पाऊस लांबल्याने लागवड नेहमीपेक्षा उशिरा झाली. लागवडीचा कालावधी लांबल्यामुळे रोपवाटिकेत फुटवे प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हळव्या, निमगरव्या भाताच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शिवाय पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे कातळावरील शेतीवर करपा रोग व लष्करी अळींचा प्रादुर्भाव झाला होता. यावर्षी एकूणच उत्पादकता घटण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.हळवी भात तयार होण्यासाठी २१ दिवस, निमगरव्या भातासाठी २५ दिवस, तर गरव्या भातासाठी २८ दिवसांचा कालावधी लागतो. जूनमध्ये भाताची पेरणी करण्यात आली. मात्र, लागवड आॅगस्टमध्ये पूर्ण झाली. हळव्या भाताच्या रोपवाटिकेत फुटवे येण्याची प्रक्रिया झाली. हळव्या जातीच्या भाताला फुटवे येऊन फुलोरा येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेरून ही प्रक्रिया दिसत नसली तरी आतून लोंबी येण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पाऊस गायब झाल्याने भात काही ठिकाणी वाळले. त्यामुळे हळव्या व निमगरव्या भाताच्या उत्पादनावर ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गरव्या जातीच्या भाताला मात्र तितकासा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)