रत्नागिरी :दोन ट्रकवर दंडात्मक कारवाई, कोल्हापूरच्या ट्रकचालकाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:43 AM2018-12-17T11:43:32+5:302018-12-17T11:50:42+5:30
वाहतूक परवाना नसताना चिऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करत तहसील कार्यालयाच्या पथकाने दोन दिवसात ५८ हजार रूपयांचा दंड केल्याने अवैधरित्या चिऱ्याची व वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांचे धाबे दणाणले आहेत.
लांजा : वाहतूक परवाना नसताना चिऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करत तहसील कार्यालयाच्या पथकाने दोन दिवसात ५८ हजार रूपयांचा दंड केल्याने अवैधरित्या चिऱ्याची व वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांचे धाबे दणाणले आहेत.
सुनील वासू पवार (विजापूर) हा ट्रक (केए - २८ - सी - २७३१) घेऊन विजापूरहून पावस येथे भात घेऊन आला होता. पावस येथे भात उतरल्यानंतर परत रिकामे जाण्यापेक्षा पावस येथून पाच ब्रास चिरा खरेदी करुन तो परत विजापूरकडे निघाला होता.
मात्र, यावेळी चिरेखाण मालक यांच्याकडून वाहतुकीचा परवाना घेतला नव्हता. लांजा-कोर्ले फाटा येथे तपासणी पथकाने गाडी अडविली. त्याच्याकडे परवाना नसल्याने ट्रक ताब्यात घेऊन ४५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
त्याचप्रमाणे वाटूळ येथे ट्रकमध्ये (एमएच - ११ - एल-४४३५) क्षमतेपेक्षा अधिक वाळू सिलिका वाळू भरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अशोक बनसोडे (कोल्हापूर) याला तपासणीसाठी थांबवले.
ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये २०ऐवजी २६ टन वाळू भरल्याचे आढळल्याने त्याला १३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
तहसीलदार वनिता पाटील यांच्यासह नायब तहसीलदार काका कुलकर्णी व तलाठ्यांनी या पथकामध्ये सहभाग घेतला होता.