रत्नागिरी : पर्ससीन मासेमारी ३१ डिसेंबरला थांबणार, हंगाम वाया गेल्याचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 04:28 PM2018-12-26T16:28:10+5:302018-12-26T16:30:23+5:30

सागरातील पर्ससीन मासेमारीचा हंगाम येत्या सहा दिवसानंतर संपणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पर्ससीन मासेमारीला केवळ ४ महिनेच परवानगी देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू झालेली ही मासेमारी आता ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद होणार आहे.

Ratnagiri: Persecine fishing will stop on 31st December, the opinion that the season was wasted | रत्नागिरी : पर्ससीन मासेमारी ३१ डिसेंबरला थांबणार, हंगाम वाया गेल्याचे मत

रत्नागिरी : पर्ससीन मासेमारी ३१ डिसेंबरला थांबणार, हंगाम वाया गेल्याचे मत

Next
ठळक मुद्दे पर्ससीन मासेमारी ३१ डिसेंबरला थांबणारनैसर्गिक आपत्तींमुळे हंगाम वाया गेल्याचे मत

रत्नागिरी : सागरातील पर्ससीन मासेमारीचा हंगाम येत्या सहा दिवसानंतर संपणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पर्ससीन मासेमारीला केवळ ४ महिनेच परवानगी देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू झालेली ही मासेमारी आता ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद होणार आहे.

राज्याच्या १२ नॉटीकल मैलाच्या सागरी जलधी क्षेत्रात ही बंदी असली तरी त्याबाहेरच्या खोल समुद्रात मासेमारी करण्यावरही शासनाने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे पर्ससीन मच्छीमारी नौकांना पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणे किवा मासेमारी बंद ठेवणे हे दोनच पर्याय उपलब्ध राहणार आहेत.

सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अतंर्गत ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी शासनाने अधिसूचना जारी केली. त्यानुसार पर्ससीन, रिंगसिंग (मिनी पर्ससीन) जाळयाने मासेमारी करण्यास केवळ सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतच राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात परवानगी देण्यात आली आहे.

१ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत पर्ससीन, मिनी पर्ससीन सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी १२ नॉटीकल मैलांच्या आत होती. त्या बाहेरील विशाल सागरी क्षेत्रात पर्ससीन नौका मासेमारी करीत होत्या. त्यासाठी शासनाने काही अटी घालून दिल्या होत्या.
आता विशाल सागरी क्षेत्रातही म्हणजेच १२ नॉटीकल मैलांच्या बाहेरील सागरी क्षेत्रात १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या कालावधीत पर्ससीन व मिनी पर्ससीन मासेमारीला पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. मात्र १२ नॉटिकल मैलांच्या सागरी क्षेत्रात पारंपरिक पध्दतीने मासेमारी सुरू राहणार आहे. राज्य सरकारने ही बंदी घातली असली तरी अन्य राज्यांमध्ये असा नियम नाही.

त्यामुळे जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रातील खोल समुद्रात परराज्यातील नौका घूसखोरी करणार असल्याचे जिल्ह्यातील मच्छीमारांचे मत असून ही घूसखोरी कशी रोखणार, असा सवालही केला जात आहे.

खोल सागरी क्षेत्रात होत असलेल्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठी वाढ होते. मात्र त्यामध्ये छोटे मासेही मारले जातात व मत्स्यपैदास कमी होते, असा आक्षेप घेण्यात आल्यानंतर पर्ससीन मासेमारीवर निर्बंध घालण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार १ आॅगस्टपासून पारंपरिक मासेमारीला सुरूवात झाली. त्यानंतर महिन्याने म्हणजेच १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. परंतु गेल्या पाच महिन्यांच्या काळात सागरी वातावरणात सातत्याने चढ उतार राहिल्याने व काही महिने पावसाळी व वादळी राहिल्याने मासेमारीच्या या पाच महिन्यांमधील निम्मा कालावधी वाया गेला आहे.

या कालावधीत मासेमारी होऊ शकली नाही. मात्र नौकेवरील खलाशांना त्यांचे वेतन द्यावे लागत होते. निम्म्या कालावधीतही मत्स्योत्पादन पुरेसे झालेले नाही. त्यामुळे यावर्षी मासेमारी व्यवसायातील आर्थिक उलाढाल कमी झाली आहे.

नैसर्गिक संकटे नेहमीचीच

१ आॅगस्ट व १ सप्टेंबरपासून सागरी मासेमारी सुरू होत असली तरी प्रत्यक्षात या कालावधीत वादळी हवामानच अधिक असते. त्यामुळे जीवावर उदार होऊन मासेमारीसाठी सागरात जाणे मच्छीमार टाळतात.

पर्ससीन मासेमारीला आधीच कमी कालावधी दिला आहे. नैसर्गिक संकटांमुळे किमान दोन महिन्यांचा कालावधी वाया जातो. त्यामुळे १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यत पर्ससीन मासेमारीला दिलेली मुदत फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढवून देण्याची मागणी पर्ससीन मच्छीमारांमधून केली जात आहे. परंतु त्याचा अद्यापही विचार शासनस्तरावर झालेला नाही.

Web Title: Ratnagiri: Persecine fishing will stop on 31st December, the opinion that the season was wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.