रत्नागिरी :विद्यार्थ्यांच्या कलेतून साकारली वन्यप्राण्यांची छायाचित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:54 PM2018-06-28T14:54:04+5:302018-06-28T15:15:14+5:30
सह्याद्र्री निसर्ग मित्र, चिपळूण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई व आयसीआयसीआय बँक यांच्यातर्फे विद्यार्थ्यांनी काढलेल्या वन्यजीवांच्या फोटोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ब्राम्हण सहाय्यक संघ सभागृह, चिपळूण येथे पार पडले. विशेष म्हणजे हे फोटो विद्यार्थ्यांनी मेहनतीने काढले आहेत आणि या फोटोमध्ये वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याच्या फोटोंचाही समावेश आहे.
चिपळूण : सह्याद्र्री निसर्ग मित्र, चिपळूण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई व आयसीआयसीआय बँक यांच्यातर्फे विद्यार्थ्यांनी काढलेल्या वन्यजीवांच्या फोटोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ब्राम्हण सहाय्यक संघ सभागृह, चिपळूण येथे पार पडले. विशेष म्हणजे हे फोटो विद्यार्थ्यांनी मेहनतीने काढले आहेत आणि या फोटोमध्ये वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याच्या फोटोंचाही समावेश आहे.
शिरोशी (जिल्हा ठाणे) येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गावित, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, सचिव उदय पंडित, नितीन नार्वेकर, प्रकल्प अधिकारी प्रसाद गोंड, सागर रेडीज, अभिषेक सिंग यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतील २० शाळांमधील निवडक ६० विद्यार्थी व २० शिक्षक उपस्थित होते.
भारत हा जगातील आठ जैवविविधतापूर्ण स्थळांपैकी एक आहे आणि भारतातील सह्याद्रीचा भाग जैवविविधतेने संपन्न आहे. या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई, तसेच आयसीआयसीआय बँक यांच्या सहकार्याने ई-मॅमल हा प्रकल्प सात जिल्ह्यांतील २० शाळांमध्ये राबविला जात आहे.
हा प्रकल्प जगातील १७ देशांमध्ये राबविण्यात येत असून, भारतात तो पहिल्यांदाच राबवून वन्यजीवांची माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्येक शाळेतील ८ वी व ९ वीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रकल्पात सहभागी प्रत्येक शाळेला ३ ट्रॅप कॅमेरे, लॅपटॉप, प्रोजेक्टर, प्रिंटर, इंटरनेट, दुर्बीण, बॅटरी आणि मेमरी कार्डस् आणि माहितीपत्रिका देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचा ५ ते १०चा गट तयार करून कॅमेरे शाळेच्या परिसरात बसविण्यात आले असून, त्यामध्ये आलेले फोटो विद्यार्थी स्वत: ई-मॅमल वेबसाईटवर अपलोड करतात. त्यानंतर ही सर्व माहिती संशोधनासाठी वापरली जाते. त्यामुळे अनेक संशोधाकांचा पैसा आणि वेळ वाचतो.
या प्रदर्शनामध्ये पट्टेरी वाघ, अस्वल आणि बिबट्या तसेच दुर्मीळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असणारे खवले मांजर त्याचप्रमाणे साळिंदर आणि सहज आढळणारे भेकर, सांबर, रानडुक्कर, रानटी ससे, काळमांजर, मुंगूस आदी प्राण्यांचे २०० फोटो या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. ई-मॅमल हा महत्त्वाचा प्रकल्प असून, वर्षभरात या विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांना खूप मेहनत करून मिळणाऱ्या फोटोंच्या तोडीसतोड फोटो मिळवले आहेत. हे फोटो जगभरातील शास्त्रज्ञ वापरणार आहेत.
सुरुवातीला मला या प्रकल्पात रुची वाटली नाही. परंतु, कॅमेऱ्यामध्ये वाघ, खवले मांजर, रानकुत्रे या दुर्मीळ प्राण्यांचे फोटो मिळाल्यामुळे आम्ही अचंबित झालो व प्रकल्पाचे महत्त्व समजून आता काम करताना मजा येते. मी भविष्यात प्राण्यांवरील संशोधन, संवर्धन करण्याचे ठरवले आहे.
- प्राजक्ता गवस,
विद्यार्थिनी, मंगेली हायस्कूल