रत्नागिरी :...येथे भातशेतीच्या मळ्यातच उगवतात खेळाडू, धामापूरकर यांची उत्तुंग झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 03:59 PM2018-08-29T15:59:39+5:302018-08-29T16:04:05+5:30

ग्रामीण भागात आजही मुलांना खेळण्यासाठी चांगली मैदाने नाहीत, ही खेदाची बाब आहे. तरीही उपलब्ध साधनांचा वापर करून गुणवान खेळाडू घडविण्याचे काम सोलगाव (ता. राजापूर) येथील शिक्षक दीपक रामचंद्र धामापूरकर हे करत आहेत.

 Ratnagiri: ... the players who emerge in paddy fields, Dhampurkar's leap | रत्नागिरी :...येथे भातशेतीच्या मळ्यातच उगवतात खेळाडू, धामापूरकर यांची उत्तुंग झेप

रत्नागिरी :...येथे भातशेतीच्या मळ्यातच उगवतात खेळाडू, धामापूरकर यांची उत्तुंग झेप

googlenewsNext
ठळक मुद्देसोलगावमधील क्रीडाशिक्षक दीपक धामापूरकर यांची उत्तुंग झेपयेथे भातशेतीच्या मळ्यातच उगवतात खेळाडू, पदरमोड करून प्रशिक्षण

अरूण आडिवरेकर 

रत्नागिरी : ग्रामीण भागात आजही मुलांना खेळण्यासाठी चांगली मैदाने नाहीत, ही खेदाची बाब आहे. तरीही उपलब्ध साधनांचा वापर करून गुणवान खेळाडू घडविण्याचे काम सोलगाव (ता. राजापूर) येथील शिक्षक दीपक रामचंद्र धामापूरकर हे करत आहेत.

मैदान नाही म्हणून मुलांना वर्गात कोंडून न ठेवता त्यांना मैदानात उतरवण्याचे काम हे शिक्षक करत आहेत. भातशेतीच्या मळ्यांचे मैदान करून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या द्रोणाचार्यांचे काम कौतुकास्पदच आहे. वेळप्रसंगी पदरमोड करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम ते करत आहेत.

सन १९९८मध्ये दापोली तालुक्यातील पांगारी गोविंद शेतवाडी या शाळेवर ते हजर झाले. आपल्या हाताखाली शिकत असलेली मुले खूपच काटक असल्याचे त्यांना जाणवले. मात्र, त्यांना खेळण्याची संधी मिळत नसल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यांनी १९९९पासून केंंद्रस्तरावर मुलींना लंगडीसारख्या खेळाचा सराव घेऊन पहिल्याच वर्षी तालुक्यापर्यंत संघ सहभागी झाला.

त्याचवर्षी दुसरीमध्ये असलेला सचिन मळेकर हा विद्यार्थी तब्बेतीने बरा असल्यामुळे त्याच्या हातात थाळी दिली आणि इयत्ता तिसरीमध्ये असताना तो तालुक्याला पहिला आला होता. मात्र, वैयक्तिक कारणामुळे तो जिल्हास्तरावर सहभागी होऊ शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



त्यानंतर २०१४ साली त्यांची सोलगाव नं. २ शाळेत बदली झाली. पहिली ते सातवीपर्यंतची शाळा असल्याने विद्यार्थीसंख्या जास्त होती. त्यामुळे निवडीला संधी होती. प्रथम त्यांनी विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेतली. त्यांच्या आवडीच्या खेळात खेळण्याची संधी दिली. दुसºया खेळात खेळून त्यांची शक्ती वाया जाते. त्यामुळे जास्तीत जास्त एका खेळात एकच विद्यार्थी सहभागी झाल्यास व योग्य प्रकारे सराव केल्यास निश्चित यश मिळते, असा त्यांचा विश्वास आहे.

मात्र, गावातील विद्यार्थ्यांना घडवताना मैदानासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाऊस संपल्यानंतर मिळेल तेवढ्या जागेत खेळण्याचा सराव घेतला जातो. भातशेतीच्या जागेचे मैदान करून त्यातच मुलांना घडविण्याचे काम ते करत आहेत. लाद्यांवर काठ्यांचा स्टॅण्ड उभा करून उंच उडीचा सराव केला जातो.

२०१५ - १६पासून प्रत्येक वर्षी शाळेचे एक-दोन विद्यार्थी जिल्हास्तरावर यश मिळवत आहेत. गेली ३ वर्षे यामध्ये खंड पडलेला नाही. जानेवारी २०१७मध्ये त्यांची विद्यार्थिनी तन्वी भिकाजी मल्हार हिने जिल्हास्तरीय उंचउडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. गतवर्षी सबज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कळंबोली (रायगड - पनवेल) या ठिकाणी दोन विद्यार्थी राज्यस्तरावर सहभागी झाले.



क्रीडांगण आवश्यक

ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धेसाठी मुलांना क्रीडांगणाची आवश्यकता फार महत्त्वाची आहे. वर्षभर सरावासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्यामुळे पुरेसा सराव घेता येत नाही. पावसाळ्यात शेती असल्यामुळे भातशेतीचे पीक घेतल्यानंतर आॅक्टोबर - नोव्हेंबरनंतर जागा उपलब्ध होते. काही ठिकाणी खेळण्यासाठी शेतीजमीन दिली जात नाही.

...अशीही मदत

मातीत उंच उडी मारताना मुलांच्या पायाला लागते म्हणून स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारा भाताचा कोंडा विकत घेऊन त्या ठिकाणी टाकून सराव घेतला जातो. पूर्वी लाकडी उंच उडीचे स्टॅण्ड होते. ते सातत्याने मोडत असत. ही गोष्ट माजी विद्यार्थ्यांना, पालकांना सांगितली. त्यानंतर बाळकृष्ण मल्हार यांनी आता लोखंडी स्टॅण्ड बनवून दिला आहे. आता कायमची सोय झाली आहे. एका विद्यार्थ्याला राज्यस्तरावर सहभागी झाल्याबद्दल मुंबई मंडळातील ग्रामस्थांनी सायकल भेट दिली.

क्रीडा साहित्यांची वानवा

उंचउडीसाठी मॅटची आवश्यकता आहे. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा या मॅटवर घेतल्या जातात. त्याच्यावर सवय नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुले घाबरतात. क्रीडा साहित्य शाळांना खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे तालुकास्तरावर तरी तशी व्यवस्था झाली तर सुट्टीच्या दिवशी विद्यार्थी सराव करतील, अर्थात तालुकास्तरावर डेरवणच्या धर्तीवर क्रीडांगणाची आवश्यकता असणे गरजेचे आहे.
 

खेळाच्या किंवा सरावाच्या वेळी विद्यार्थी जखमी होतात. ग्रामीण भागातील पालक शेतकरी असल्यामुळे खर्च करताना अडचणी येतात. अशावेळी विद्यार्थ्यांसाठी तातडीने वैद्यकीय सुविधा तीही मोफत असावी, असे वाटते. ती नसल्यामुळे पालक आपल्या मुलांना खेळण्यासाठी प्रतिबंध करतात. प्रत्येक शाळेत क्रीडाशिक्षक महत्त्वाच असून, शाळास्तरावर आवश्यकतेप्रमाणे क्रीडासाहित्य उपलब्ध होणे गरजेचे आहे.
- दीपक रामचंद्र धामापूरकर, क्रीडाशिक्षक

Web Title:  Ratnagiri: ... the players who emerge in paddy fields, Dhampurkar's leap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.