रत्नागिरी : पोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 04:26 PM2018-10-24T16:26:24+5:302018-10-24T16:28:26+5:30
स्थानिक वाहतूकदार आणि शासकीय ठेकेदार यांच्यातील वादामुळे नोव्हेंबर महिन्याची धान्याची वाहतूक खोळंबली असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवारपासून अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात सर्व तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
रत्नागिरी : स्थानिक वाहतूकदार आणि शासकीय ठेकेदार यांच्यातील वादामुळे नोव्हेंबर महिन्याची धान्याची वाहतूक खोळंबली असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवारपासून अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात सर्व तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
स्थानिक वाहतूकदारांना डावलून क्रिएटिव्ह क्रेन या शासननियुक्त ठेकेदाराकडून सध्या धान्य वाहतूक केली जात आहे. त्यामुळे स्थानिक ठेकेदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप स्थानिक वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मध्यंतरी शासननियुक्त ठेकेदाराच्या गाड्या स्थानिक वाहतूकदारांनी परत पाठविल्या होत्या.
जिल्ह्यातील सर्वच धान्य दुकानांमधून सप्टेंबर महिन्यातील धान्याची उचल झाली असून, आॅक्टोबर महिन्याच्या एकूण ६६०० टन धान्यापैकी ६४ टक्के धान्याची उचल पॉस मशीनद्वारे करण्यात आली आहे. मात्र, शासकीय ठेकेदाराची वाहने भीतीपोटी कमी करण्यात आल्याने नोव्हेंबरच्या धान्याच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.
पुढील महिन्याच्या सहा तारखेपासून दिवाळी असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेऊन पोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरानजीकच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात धान्याची वाहतूक सर्व तालुक्यांना सुरू झाली आहे.
जनतेला वेळेत धान्य मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे दक्ष असून, याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्याला जाणाऱ्या धान्याच्या वाहनासोबत पोलीस कर्मचारी देण्यात येत आहे.
पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभाग यांच्या सहकार्याने ही धान्याची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे जनतेला दिवाळीचे नियतन वेळेत मिळणार असल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.
नोव्हेंबर महिन्यातील धान्याच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे धान्याचे वितरण जनतेला वेळेत होणार आहे. या वाहतुकीत अडथळा निर्माण करून गैरसोय निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया दोषी व्यक्तींवर यापुढेही गुन्हे दाखल करण्यात येतील.
डॉ. जयकृष्ण फड,
जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी